पिंपरी-चिंचवडमध्ये चोरीच्या दररोज सात घटना तर, १९ तासांत होतेय एक घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:18 PM2022-12-31T12:18:25+5:302022-12-31T12:19:03+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत यंदा दररोज चोरीच्या सरासरी सात घटनांची नोंद...
- नारायण बडगुजर
पिंपरी : कोरोना महामारीनंतर चोरीच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना महामारीपूर्वीच्या घटनांपेक्षा जास्त यंदाची आकडेवारी आहे. त्यामुळे ‘चोर मचाये शोर...’ असेच म्हणावे लागेल. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत यंदा दररोज चोरीच्या सरासरी सात घटनांची नोंद करण्यात आली. तर दर १९ तासाला घरफोडीचा एक प्रकार उघडकीस येत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. नव्याने गुन्हेगारांचा शिरकाव झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तपासाचा टक्का वाढवून चोरट्यांचा ‘बंदोबस्त’ करण्याचे आव्हान पोलिसांना नवीन वर्षात पेलावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यातील तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक जण आयुक्तालयाच्या हद्दीत ओळख लपवून वास्तव्य करतात. एमआयडीसीमध्ये किंवा मिळेल ते काम करून असे गुन्हेगार आश्रयाला असतात. त्यांच्यातील अनेकांकडून गुन्हेगारी कृत्य केले जाते. परिणामी शहरतील गुन्हेगारीत भर पडते.
अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तसेच वाहन व इतर साधनसामुग्री नाही. परिणामी पोलिसांवर कामकाजाचा मोठा ताण आहे.
वाॅंटेड, फरार आरोपींची शोधमोहीम सुरू
संशयित आरोपींची वेळोवेळी तपासणी केली जाते. हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवला जातो. हद्दपार केलेले गुन्हेगार पुन्हा हद्दीत येऊन गुन्हे करतात का, याकडेही लक्ष दिले जात आहे. तसेच पाहिजे व फरारी आरोपींची शोधमोहीम सुरू आहे. यात अनेक वर्षांपासून फरार असलेल्या काही गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. उकल करण्याच्या दृष्टीनेही पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
अशी घ्या काळजी
घरे, खिडक्या रात्री व्यवस्थित बंद करा, घर बंद करून गावी जाताना शेजाऱ्यांना सांगा. चोरटे सहज तोडू शकणार नाहीत असे कुलूप लावा, घर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावा. संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवा, बस- रेल्वे प्रवासात मौल्यवान ऐवज सांभाळा. रस्त्याने एकटे पायी जाणे टाळावे.
गर्दीत जाताय; मोबाइल सांभाळा
मोबाइल व वाहन चोरीच्या घटनांमध्ये खंड नाही. पूर्वी मोबाइल गहाळ झाल्याची नोंद होत असे, आता थेट गुन्हा नोंद होतो. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यांचा आकडा वाढल्याचे दिसून येते. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी गर्दीत जाताना स्वत:चा मोबाइल, पाकीट सांभाळणे गरजेचे आहे. वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करून, लॉक लावणे गरजेचे आहे.
वर्ष निहाय गुन्हे व तपास...
वर्ष - २०२०
गुन्हा - दाखल - उघड
दरोडा - २४ - २४
जबरी चोरी - १८८ - १३८
घरफोडी - २७१ - ११९
एकूण चोरी - १४३० - ३६४
वर्ष - २०२१
गुन्हा - दाखल - उघड
दरोडा - ५४ - ५४
जबरी चोरी - ३५५ - २५४
घरफोडी - ३५५ - १४७
एकूण चोरी - २११२ - ६२२
वर्ष - २०२२ (नोव्हेंबर अखेर)
गुन्हा - दाखल - उघड
दरोडा - ५० - ४८
जबरी चोरी - ४२७ - २४६
घरफोडी - ४०३ - १२९
एकूण चोरी - २५२२ - ६४५