पिंपरीत हजारभर ‘बाळां’नी सुसाट दामटल्या गाड्या! पालकांना ६४ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:47 AM2024-05-27T10:47:16+5:302024-05-27T10:47:55+5:30

अल्पवयीन असलेल्या, तसेच १६ वर्षांखालील मुलांनी वाहन चालविल्याचे प्रकार समोर

In Pimpri thousands of students have joined the cars 64 lakh fine to parents | पिंपरीत हजारभर ‘बाळां’नी सुसाट दामटल्या गाड्या! पालकांना ६४ लाखांचा दंड

पिंपरीत हजारभर ‘बाळां’नी सुसाट दामटल्या गाड्या! पालकांना ६४ लाखांचा दंड

पिंपरी : अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्यांवर, तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते २४ मे २०२४ या कालावधीत ९८३ जणांवर याप्रकरणी कारवाई केली. यात बेशिस्त वाहन चालकांना ६३ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेंतर्गत १४ वाहतूक विभाग आहेत. या प्रत्येक विभागातर्फे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यात वाहन परवाना नसलेल्यांवर बडगा उगारला. भोसरी, चाकण आणि सांगवी वाहतूक विभागात ही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यासाठी गर्दीच्या वेळेत, तसेच मुख्य रस्ते आणि चौकात तपासणी करण्यात आली. यात संशयित वाहन चालकांकडे परवाना नसल्याचे समोर आले. त्यातील अल्पवयीन असलेल्या, तसेच १६ वर्षांखालील मुलांनी वाहन चालविल्याचे प्रकार समोर आले.

पालकांना दंड

अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास पालकांना दंड आकारला जातो, तसेच संबंधित अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी न देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पुण्यातील प्रकरणानंतर वाहतूक पोलिस ‘अलर्ट’

पुण्यातील कल्याणीनगर येथील प्रकरणानंतर पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिस ‘अलर्ट’ झाले आहेत. अल्पवयीन मुले वाहन चालवीत असल्यास कारवाई केली जात आहे, तसेच विनापरवाना, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई होत आहे. त्यासाठी दिवसा व रात्रीही कारवाई करणे सुरू आहे. रात्री स्थानिक पोलिस ठाण्यांच्या नाकाबंदीदरम्यान वाहतूक पोलिस ड्रंक ॲण्ड ड्राइव्हची कारवाई केली जात आहे.

वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. पालकांनी अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. -विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

Web Title: In Pimpri thousands of students have joined the cars 64 lakh fine to parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.