दहा दिवसात हिंजवडी घेणार मोकळा श्वास; पोलिस आयुक्तांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 08:11 AM2024-04-25T08:11:46+5:302024-04-25T08:12:40+5:30
पुढील दहा दिवसांत हिंजवडी मोकळा श्वास घेईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला....
पिंपरी : मेट्रोने काम झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढून घ्यावेत, गर्दीच्या वेळेत अवजड वाहने आणून काम करू नये, अशा सूचना पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि पुढील दहा दिवसांत हिंजवडी मोकळा श्वास घेईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
आयुक्त चौबे यांनी मेट्रोच्या कामाची बुधवारी दिले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे उपप्रकल्प संचालक अमन भट्टाचार्य आणि अन्य अधिकाऱ्यांना या वेळी घटनास्थळी पाचारण केले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेतून पुढील दहा दिवसात हिंजवडी मोकळा श्वास घेईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पिंपरी -चिंचवड वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त सतीश कसबे, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे उपप्रकल्प संचालक अमन भट्टाचार्य आदी यावेळी उपस्थित होते.
आयटी पार्क हिंजवडीमधील वाहतूक कोंडी हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून माण- हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता अडविला आहे. मात्र, ज्या भागातील मेट्रोपिलर आणि गर्डरचे काम पूर्ण झाले आहे; तेथील बॅरिकेड्स तत्काळ काढून घेण्यात यावेत. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस मेट्रोने अवजड वाहने लावून काम करू नये. नागरिकांना या कामाचा त्रास होऊ नये, असे आदेश पोलिस आयुक्त चौबे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना दिले.