Pimpri Chinchwad Crime: ताथवडेतील गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी जागामालकासह चौघांवर गुन्हा
By नारायण बडगुजर | Published: October 9, 2023 04:12 PM2023-10-09T16:12:48+5:302023-10-09T16:12:58+5:30
गॅस रिफिलिंगसाठी जागा देणे भोवले...
पिंपरी : टँकरमधून गॅस चोरी करताना सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत ताथवडे येथे जेएसपीएम महाविद्यालयाजवळ रविवारी (दि. ८) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या स्फोटांमुळे रविवारी (दि. ८) मध्यरात्री पिंपरी-चिंचवड हादरले.
महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोह. रशीद मोह. नसीम (रा. अलाहाबाद प्रयागराज), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) यांच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाकडचे पोलिस उपनिरीक्षक भारत माने यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ९) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोह. रशीद मोह. नसीम हा गॅस टँकर चालक आहे. तो त्याच्या ताब्यातील गॅस टँकर घेऊन ताथवडे येथे आला. त्यानंतर टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून घरगुती व व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरत होता. काळ्या बाजारात वाढीव दरात विक्रीसाठी गॅस चोरी करीत होता. टँकरच्या जवळ एक टेम्पो उभा करून त्यातील सिलिंडरमध्ये गॅस भरला जात होता. त्यावेळी सिलिंडरचा स्फोट झाला.
नऊ सिलिंडरचा स्फोट
टँकरच्या जवळ असलेल्या टेम्पोमध्ये घरगुती व व्यावसायिक वापराचे एकूण २७ सिलिंडर होते. त्यातील नऊ सिलिंडरचा स्फोट झाला. तसेच एक सिलिंडर फुलगलेला होता. तसेच एक सिलिंडरला गळती सुरू होती. टँकरमधून गळती झालेल्या गॅसचा मोठ्या दाबाने सिलिंडरवर मारा झाला. त्यामुळे तापलेले सिलिंडर एकापाठोपाठ फुटले. स्फोट झालेले सिलिंडर घटनास्थळी अस्ताव्यस्त पडले होते.
टेम्पो, तीन बस खाक
गॅस सिलिंडर असलेला टेम्पो तसचे तेथील तीन स्कूलबस जळून खाक झाल्या. स्फोटांच्या आवाजाने परिसरात घबराट झाली. तसेच आगीचे लोट आणि धुराचे लोळ आठ ते १० किलोमीटर अंतरावरून दिसत होते.
गॅस रिफिलिंगसाठी जागा देणे भोवले
गॅस रिफिलिंगचा हा प्रकार गैर कायदेशीर आहे, असे माहीत असतानाही जागा मालक चंद्रकांत महादेव सपकाळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सपकाळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला.