Hinjawadi Fire Incident: ‘मॉर्निंग वॉक’साठी आले अन् 'ते दोघे' देवदूत बनले...पण, चौघांना वाचवता न आल्याची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:17 IST2025-03-21T10:14:04+5:302025-03-21T10:17:30+5:30
त्या दोघांनी बस उभी असलेल्या शेजारच्या कंपनीमधील सुरक्षा रक्षकांना हाक दिली, जखमींना बाहेर काढले, तातडीने अग्निशमन दलाला फोन करून ठिकाण कळवले

Hinjawadi Fire Incident: ‘मॉर्निंग वॉक’साठी आले अन् 'ते दोघे' देवदूत बनले...पण, चौघांना वाचवता न आल्याची खंत
वाकड (हिंजवडी) : ‘ते’ दोघेही मुलांना शाळेत सोडून ‘मॉर्निंग वॉक’साठी हिंजवडी आयटी पार्क फेज १ मध्ये आलेले. तेवढ्यात आग लागलेली मिनी बस हेलकावे खात येताना दिसली. पहिल्यांदा बसच्या खिडकीतून एकाने उडी मारली. बस थोडी पुढे जाताच अजून एकाने उडी मारली, पाठोपाठ तिसऱ्याने... काही अंतरावर बस कठड्याला धडकून थांबली आणि ‘त्या’ दोघांनी मागे-पुढे न पाहता मदतीसाठी धाव घेतली... जखमींना बाहेर काढणारे ‘ते’ दोघे म्हणजे काकडे दाम्पत्य अक्षरश: देवदूत ठरले.
१. श्रीकांत काकडे आणि संध्या काकडे रोज मुलांना शाळेत सोडून चालण्यासाठी हिंजवडी आयटी पार्क परिसरात येतात. तसेच ते बुधवारीही आले. तेथील रुबी हॉल हॉस्पिटल भागात चालत जाण्याचे ठरले आणि काही पावले चालत गेले. तोच आग लागलेली मिनी बस हेलकावे खात येताना दिसली. प्रथम डाव्या बाजूने खिडकीतून एकाने उडी मारली. बस थोडी पुढे जाताच अजून एकाने उडी मारली. नंतर आणखी एकाने उडी मारली. पुढे काही अंतरावर कठड्याला धडकून बस थांबताच काकडे दाम्पत्याने मदतीसाठी धाव घेतली.
२. श्रीकांत काकडे स्वतः वाहन व्यावसायिक असल्याने त्यांनी गांभीर्य ओळखले. बस उभी असलेल्या शेजारच्या कंपनीमधील सुरक्षा रक्षकांना हाक दिली. त्यांना मदतीला घेऊन जखमींना बाहेर काढले. लगेच अग्निशामक दलाला फोन करून ठिकाण कळवले.
३. अग्निशामक दलाची गाडी व्यवस्थित घटनास्थळी यावी म्हणून काकडे यांनी सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन मागून येणारी वाहने थांबवली. गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली. अग्निशामक दलाच्या गाडीला वाट करून दिली. संध्या काकडे यांनी जखमींना सुरक्षित ठिकाणी बसवून त्यांना धीर दिला. एवढ्यावरच न थांबता रुबी हॉल हॉस्पिटलचे सुरक्षा प्रमुख मनोज काकडे यांना श्रीकांत काकडे यांनी फोन केला आणि रुग्णवाहिका आणण्यासाठी स्वतः गेले.
४. ते रुग्णवाहिका घेऊन आले. त्यात सर्व जखमींना बसवून थेट हॉस्पिटलमध्ये गेले. तोपर्यंत तेथील सुरक्षा रक्षकांना सोबतीला घेऊन शेजारच्या कंपनीमधील पाण्याच्या पाईपच्या सहाय्याने पेटलेल्या बसवर पाणी मारण्यासाठी संध्या सरसावल्या. तेवढ्यात अग्निशामक दलाची गाडी आलीच. बाकीचे नागरिकही मदतीला धावून आले.
५. श्रीकांत यांनी मागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीच्या लोळांमुळे गाडी खूप गरम झाली होती, तर लॉक झाल्याने दरवाजा उघडणे अवघड बनले होते. आगीने रौद्ररूप धारण केले होते. समोरचे काही दिसत नव्हते. चौघे जण वगळता बाकीचे तर बाहेर पडले होते. आतून चौघांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या...
त्या सिलिंडरमुळे अनर्थ टळला...
शेजारून एक बस जात होती. त्यात अग्निशमन सिलिंडर होता. त्या बसमधील चालकाने लगेच सिलिंडर दिला. तो आगीवर फवारण्यात आला. परंतु, आग मोठी होती आणि सिलिंडर छोटा होता. मात्र, त्या सिलिंडरमुळे आग इंधनाच्या टाकीपर्यंत पोहोचली नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
पेटलेल्या बसमधून लोक उडी मारताना दिसले आणि आग वाढताना दिसली. बसमध्ये मागे बसलेले लोक प्रयत्न करत होते, पण दरवाजा उघडता येत नव्हता. आगीमुळे आम्हालाही काही करता येत नव्हते. - श्रीकांत काकडे, स्थानिक रहिवासी
परिस्थिती खूप भयानक होती. सकाळची वेळ असल्याने वर्दळ नव्हती. शेजारच्या सुरक्षा रक्षकांनी मदत केली. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनीही मदतीचा हात दिला. - संध्या काकडे, स्थानिक रहिवासी