१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन

By विश्वास मोरे | Published: January 6, 2024 04:37 PM2024-01-06T16:37:13+5:302024-01-06T16:38:51+5:30

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा पडदा आज सकाळी उघडला.....

Inauguration of 100th All India Marathi Theater Conference in a spectacular ceremony | १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन

साधू मोरया गोसावी नगरी (चिंचवड) :  देशाला ज्याप्रमाणे पुरातन मंदिरं आणि शौर्याचा इतिहास आहे. तसाच नाट्य आणि नृत्य परंपरेचा  इतिहास आहे. त्यामुळेच मराठी प्रेक्षक ओटीटी आणि सोशल मीडिया असताना देखील नाटकांना गर्दी करतात. राजकारणी चांगले कलाकार आहेत असे बोलले जाते. मात्र तुमची कला आमच्या पेक्षा अवघड आहे. राजकारणात कधी कधी धाडसी निर्णय घेतले जातात. दीड वर्षांपूर्वी सत्ता बदलाचा पहिला अंक झाला आहे. आता दुसरं अंक सुरू आहे. तर निवडणुकीच्या निकाला नंतर तिसरा अंक पार पडणार आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. 

 १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा पडदा आज सकाळी उघडला. आज पिंपरी- चिंचवड येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नाट्य परिषदेचे तहयात सदस्य अध्यक्ष शरद पवार, मावळते संमेलनाध्यक्ष  प्रेमानंद गज्वी, १०० व्या संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले,  उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष राजेश कुमार सांकला, उपाध्यक्ष नरेश गडेकर, अ. भा. म. नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. या सोहळ्यात मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी  जब्बार पटेल यांना संमेलनाअध्यक्षांची सूत्रे सुपूर्द केली. नाट्य संमेलनाची स्मरणिका ‘नांदी’, नाट्य संमेलनाध्याक्ष प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथान ‘रंगनिरंग’ याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तिकीट दरात कपात करा

शरद पवार म्हणाले, नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि  वास्तवावर भाष्य करणारी नाटकं  व्हायला हवीत. प्रायोगिक व व्यावसायिक, बाल रंगभूमीला विशेष अनुदान राज्य सरकारने दिले पाहिजे. तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तिकीट दरात कपात व्हावी.   

डिजिटल माध्यमातील नाटकांमध्ये जिवंतपणा नाही! 

 चित्रपटसृष्टी आधी हजारो वर्ष सर्वाधिक प्रभावी माध्यम ही रंगभूमी होती. मात्र आता  जवळपास सर्व निर्माते कलाकार हे हिंदी चित्रपटाकडे वळत आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी ओस पडत आहे. तसेच हल्ली डिजिटल माध्यमातही नाटकं सादर होतात. मात्र, त्यामध्ये रंगभूमीचा जीवंतपणा नसतो,  असेही पवार यांनी सांगितले. 

बॅक स्टेज कलाकार, तंत्रज्ञान यांचा देखील विचार व्हायला पाहिजे!

उदय सामंत म्हणाले, १०० नाट्य संमेलन होताना माजी संमेलनाअध्यक्षांची आठवण ठेवली ही कौतुकास्पद आहे. ज्या प्रमाणे उद्घाटन सोहळा होत आहे. त्याप्रमाणे उर्वरीत विभागीय संमेलनं व्हायला हवीत. मात्र संमेलन होत असताना त्यावेळी बॅक स्टेज कलाकार, तंत्रज्ञान यांचा देखील विचार व्हायला पाहिजे.''

नाटक पाहण्याची सवय लावावी!

प्रशांत दामले म्हणाले, आम्हा कलाकारांसाठी नाट्य संमेलन दिवाळी असते. प्रत्येक जण नाटक, ओटीटी, सिनेमा यामध्ये काम करत असतो. मात्र सगळे यामधून वेळ काढून या संमेलनासाठी येतात. आमचे विचार व्यक्त करण्यासाठी ही योग्य जागा आहे. रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीला नाटक पाहण्याची सवय लावावी, अशी अपेक्षा यावेळी प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. 

नाट्य संमेलनाअध्यक्षांना वेगळे दालन व्हावे! 

 प्रेमानंद गज्वी यांनी विविध मागण्या मांडल्या. तसेच, नाट्य संमेलनाअध्यक्षांना मिळणारा निधी कमी आहे. तो वाढून मिळावा, त्याचप्रमाणे नाट्य परिषदेच्या कार्यालयात नाट्य संमेलनाअध्यक्षांना वेगळे दालन व्हावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  सध्या सामाजिक कुरूपता जी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी सर्व कलाकारांनी पुढे यायला पाहिजे.  असेही त्यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये!

१०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल म्हणाले,  माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक दिग्गजांचे योगदान आहे. नाट्यसृष्टीचे  अनेक प्रश्न आहेत. आज प्रामुख्याने  मी  नाटकात येऊ इच्छित असलेल्या मुलांसाठीचा महत्वपूर्ण विषय मांडत आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापिठात नाट्य विभाग आहे मात्र त्यांना त्यासाठीचा खर्च  त्यांनीच उभा करायचा आहे, हा खर्च ५ ते ७ कोटी रुपयांचा आहे, प्रत्येक विद्यापीठाला तो झेपणारा नाही यामुळे राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिले पाहिजे. तसेच इथे सादर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये असे सांगितले. 

Web Title: Inauguration of 100th All India Marathi Theater Conference in a spectacular ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.