टक्केवारीसाठी अडवणूक
By admin | Published: June 28, 2017 04:14 AM2017-06-28T04:14:49+5:302017-06-28T04:14:49+5:30
गेल्या तीन महिन्यांत महापालिकेत लाचप्रकरणी अधिकारी व कर्मचारी यांना रंगेहात पकडण्याच्या तीन घटना घडल्या. त्यात आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : गेल्या तीन महिन्यांत महापालिकेत लाचप्रकरणी अधिकारी व कर्मचारी यांना रंगेहात पकडण्याच्या तीन घटना घडल्या. त्यात आयुक्त कार्यालयातील स्वीय सहायकाचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचे संकेत मिळाले असताना, महापालिकेचे मुख्य लेखापाल बिलांची रक्कम अदा करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावत आहेत. बिले काढण्यासाठी ३ टक्के रकमेची मागणी केली जात असल्याच्या आरोप करीत ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवली आहे. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खुलासा मागितला आहे. यामुळे महापालिका वतुर्ळात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी ३१ मार्च ही आर्थिक वर्षाची मुदत संपल्याचे कारण पुढे करत १६० कोटींची ठेकेदारांची बिले अडविली आहेत. राजेश लांडे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. ज्या ठेकेदारांची बिले रोखून धरली आहेत. त्या ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर तक्रार दिली आहे. त्यावर
पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका
आयुक्त हर्डीकर यांच्याकडे खुलासा मागितला आहे.
मुख्य लेखापाल ३ टक्के रकमेची मागणी करतात. याबद्दल तक्रारदारांनी काही पुरावे द्यावेत, असे आयुक्तांचे म्हणणे असून तक्रारदारांची माहिती मागवली आहे, अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. याप्रकरणी मुख्य लेखापाल लांडे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. त्यांनी खुलासा दिला आहे. तक्रारदाराची माहिती प्राप्त होताच पंतप्रधान कार्यालयाकडे खुलासा पाठविला जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.