अवकाळी पावसाचा मावळात धुमाकूळ, भातशेतीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:25 AM2018-11-07T01:25:50+5:302018-11-07T01:25:54+5:30
मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची चिन्हे दिसत होती. काळे ढग, सोसाट्याचा वारा आदींमुळे नुकतेच कापणी केलेले भातपीक वाचवण्यात, तर काही शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असताना रविवारी दुपारनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात मोठा धुमाकूळ घातला.
कामशेत : मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची चिन्हे दिसत होती. काळे ढग, सोसाट्याचा वारा आदींमुळे नुकतेच कापणी केलेले भातपीक वाचवण्यात, तर काही शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असताना रविवारी दुपारनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात मोठा धुमाकूळ घातला. यात अनेक शेतक-यांच्या भातशेतीचे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या सुरुवातीला झालेल्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
परतीच्या पावसाने मावळात समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यामुळे भात उत्पादनात मोठी घट झाल्याचे शेतकºयाकडून सांगण्यात येत आहे. त्यातच हाता-तोंडाशी आलेले पीक कापणी करून शेतात पडलेले, तर काहींची कापणी सुरू असताना रविवारी अवकाळी पाऊस आला. विजांच्या लखलखाटासह कोसळणाºया पावसाने अवघ्या काही तासांत शेतीचे मोठे नुकसान केले. आधीच पावसाने ओढ दिल्याने भातउत्पादक चिंतेत असताना मिळेल ते पीक पदरी पाडण्यासाठी जीवाचे रान करताना भातशेतीचे नुकसान झाले आहे. नाणे मावळ परिसरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाणे मावळ हा परिसर भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. आधीच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भाताचा उतारा कमी मिळून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.
युवा सेनेतर्फे मंडलाधिका-यांना निवेदन
कार्ला : अवकाळी पावसाने मावळ तालुक्यातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी करून शेतकºयांनी शेतात ठेवलेले भातपीक भिजले आहे. वर्षभर शेतात केलेले कष्ट वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतकºयांनी झोडणी केली व जनावरांसाठी पेंढा रचून ठेवला. तो संपूर्ण पेंढा या अवकाळी पावसाने भिजला. भविष्यात चाºयाचा प्रश्नही उद्भवणार आहे. या संदर्भात शासनाने अशा भातपिकाची व चाºयाची पाहणी करून तातडीने पंचनामा करून शेतकºयांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मावळ विधानसभा युवासेना चिटणीस विशाल हुलावळे, भारतीय विद्यार्थी सेना वाकसई गण अध्यक्ष नितीन देशमुख, युवासैनिक शुभम गायकवाड, हिंदुराज कोंडभर, अक्षय हुलावळे, बंटी हुलावळे, आदित्य हुलावळे, शुभम मावकर, अमोल इंगवले, गिरीश हुलावळे, प्रतीक हुलावळे, सौरभ हुलावळे यांनी निवेदन दिले.
नुकसानभरपाईची अपेक्षा
पावसामुळे हाती आलेल्या भाताच्या पिकाचे शेतातच भाताचे दाणे गळून पडणे, भात लाल पडणे, गिरणीत भरडायला घेऊन गेल्यावर भाताचा तुकडा पडणे आदी समस्या या अवकाळी पावसामुळे निर्माण झाल्या आहेत. त्यातच पेंढा भिजल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. हा पेंढा शेतकरी वर्षभर साठवून जनावरांसाठी पुरवत असतो. अवकाळी पावसामुळे भाताचा पेंढा भिजल्यामुळे जनावरांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्यावसायिक, ग्राहकांची तारांबळ
दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू असताना पाऊस झाला. त्यामुळे बाजारातील पथारीवाले, हातगाडीवाले व ग्राहकांची मोठी धांदल उडाली. मावळातील प्रमुख बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या कामशेत शहरामध्ये अनेक दुकाने, हातगाडीवाले, रस्त्याच्या कडेला छोटी दुकाने थाटून मातीच्या पणत्या, आकर्षक आकाशकंदील, रांगोळी, तयार किल्ले, किल्यांवरील खेळणी विक्री आणि खरेदीची लगबग सुरू होती.
भातपिकाचे पंचनामे करा
वडगाव मावळ : अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करावेत, अंगावर वीज पडून मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून भरीव मदत मिळावी, अशी मागणी मावळ तालुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, नगरसेवक किशोर भेगडे, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, नारायण ठाकर, चंद्रकांत दाभाडे, अंकुश आंबेकर, आशिष खांडगे, बाबाजी गायकवाड, भाऊ ढोरे, स्वामी गायकवाड, नामदेव शेलार, नामदेव शेलार व अन्य पदाधिकाºयांनी याबाबत निवेदन दिले आहे.
तहसीलदार रणजीत देसाई यांना निवेदन देण्यात आले आहे. मावळ तालुक्यात अन्नदात्या शेतकºयांसाठी रविवारी झालेला अवकाळी पाऊस दुर्दैवी ठरला. वीज पडून शोभा शिरसट, खंडू शिरसट, सुनंदा कचरे असा तिघांचा मृत्यू झाला. तसेच भोईरे येथील भोईरकर यांना भातपिकांचे झालेले नुकसान पाहून हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. कोंडिवडे येथील प्रकाश काशिनाथ खरमारे हे विजेच्या धक्क्याने जखमी झाले. मृत्यू पावलेले चौघे व एक जखमी अशा सर्व कुटुंबीयांना भरीव मदत मिळावी. तसेच भातपीक परिपक्व होत असताना शेवटचा पाऊस न पडल्याने ६० ते ७० टक्के भातपिकांचे नुकसान झाले आहे. भातकापणीचे काम सुरू असताना रविवारी अचानक अवकाळी पाऊस पडल्याने उर्वरित ३० टक्के राहिलेले भातपिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. याबाबत त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.