डासांच्या प्रादुर्भावाने धोका, महापालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:29 AM2018-08-14T01:29:27+5:302018-08-14T01:29:31+5:30
पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.
जाधववाडी - पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात काही ठिकाणी आजही उघडी गटारे आहेत. या गटारांमध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. जाधववाडी परिसरातही अशीच परिस्थिती आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. त्यामुळे अशा अडगळींच्या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे.
नागरी वस्तीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी डासांचा त्रास वाढतो.
पावसामुळे वाढलेले गवत व साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे़ विशेषत: सकाळी व सायंकाळी डासांचा त्रास अधिक वाढतो.
खबरदारी घेण्याबाबत उदासीनता
शहरात आणि जाधववाडी परिसरातही डेंगी सदृश रुग्णही आढळले आहेत. घराघरांतील पाण्याच्या साठवण केलेल्या टाक्या, फ्रिजच्या मागील भागात साचलेले पाणी, वाहनांचे पंक्चर काढण्याकरिता साठवण्यात आलेले पाणी आदींबाबत खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत शहरात जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र काही भागातच ही जनजागृजी होत आहे. परिणामी अन्य भागातील नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याबाबत उदासीनता दिसून येते.
जुने टायर, भंगारामुळे डासोत्पत्ती
कुदळवाडी परिसरात भंगार मालाची गोदामे आहेत. यात उघड्यावर भंगार ठेवण्यात आलेले असते. या भंगार वस्तूंमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. या भंगार वस्तूंमुळे अडगळीची ठिकाणे तयार होतात. ही अडगळीची ठिकाणे डासांची पैदास केंद्र ठरतात. या भागात टायर विक्रेतेही मोठ्या संख्येने आहेत. जुन्या टायरचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय या भागात मोठ्या प्रमाणात होतो. असे टायर गोदामात आणि रस्त्याच्याकडेला उघड्यावर ठेवलेले असतात.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
जाधववाडी परिसरात यंदा पंधरा ते वीस डेंगी सदृश रुग्ण तर अनेक जण विविध प्रकारच्या तापाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. परिसरात तसेच कुदळवाडी भंगार वस्त्यातील नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भंगार व्यावसायिकांमध्ये जागृती हवी
कुदळवाडीतील भंगाराच्या व्यावसायिकांमध्ये जागृतीची गरज आहे. भंगार वस्तू कशा पद्धतीने ठेवाव्यात, गोदाम बंदिस्त असावे, पावसाचे पाणी साचू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, अडगळीची ठिकाणे शोधून तेथे औषध फवारणी करावी आदींबाबत या व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडी भागात विशेष उपक्रम राबविला पाहिजे.
औषध, धूर फवारणीची मागणी
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. मात्र काही मोजक्याच भागात ही उपाययोजना करण्यात येत आहे. दाट वस्तीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र मोकळ्या जागांवर औषध फवारणी होत असल्याचे दिसून येत नाही. मोकळ्या जागांवरही धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.