मुंबई - सातारा रस्त्यावरील घटना! चेहऱ्यावर मिरचीची पूड टाकत धक्काबुक्की करून ९ लाखांना लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 06:43 PM2021-07-12T18:43:51+5:302021-07-12T18:43:57+5:30
आरोपीने कमी किंमतीत सोने देतो असे सांगितले. सोने देण्यासाठी सागर याने बाफना यांना मुंबई - सातारा सर्व्हिस रोड, रावेत येथे नेले
पिंपरी: 'कमी किमतीत सोने देतो', असे सांगून एका व्यक्तीला रावेत येथे नेले. त्यानंतर तिथे काही जणांनी मिळून व्यक्तीला धक्काबुक्की करत मिरची पूड तोंडावर टाकून चाकूचा धाक दाखवत नऊ लाख रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना ८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मुंबई-सातारा सर्व्हिस रोड, रावेत येथे घडली.
रमेश हिराचंद बाफना (वय ४६, रा. कॅम्प पुणे) यांनी याबाबत रविवारी (११ जुलै) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर भालेराव आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाफना आणि सागर भालेराव हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सागर याने बाफना यांना कमी किंमतीत सोने देतो असे सांगितले. सोने देण्यासाठी सागर याने बाफना यांना मुंबई - सातारा सर्व्हिस रोड, रावेत येथे नेले. तिथे दुचाकीवरून सागरचे साथीदार आले. आरोपींनी बाफना यांना धक्काबुक्की करत मिरची पूड तोंडावर टाकली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून बाफना यांच्या गाडीतील ९ लाख रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेली.