पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचे प्रकार सुरूच; कोरोना मृताकडील मौल्यवान ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 03:31 PM2021-05-15T15:31:33+5:302021-05-15T15:33:01+5:30
जम्बो कोविड सेंटर येथील रुग्ण व मृतांच्या मौल्यवान ऐवजाची चोरी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.
पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याकडील रोकडसह इतर ऐवज चोरीला गेला. पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटर येथे ८ ते १० एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
महेंद्र विश्वासराव फणसे (वय ५१, रा. धानोरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १४) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे विजय मारूती चव्हाण यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटर येथे दाखल केले होते. त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्याकडील १० हजारांची रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड, विमा पॉलिसीचे कार्ड, एटीएम कार्ड, पेन्शन कार्ड, असा ऐवज अज्ञात आरोपीने चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
जम्बो कोविड सेंटर येथील रुग्ण व मृतांच्या मौल्यवान ऐवजाची चोरी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रुग्ण व मृतांचा मौल्यवान ऐवज त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे मात्र काही चोरटे त्यावर डल्ला मारत आहेत. याप्रकरणी यापूर्वीही पिंपरी पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.