आवक वाढल्याने ‘हापूस’ आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:24 AM2019-04-01T00:24:09+5:302019-04-01T00:24:37+5:30
पिंपरी बाजारपेठ : पायरी, लालबाग आंबा झाला दाखल
पिंपरी : शहरात दोन आठवड्यांपूर्वी हापूस आंबा दाखल झाला. मात्र अपेक्षित आवक नसल्याने हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. मात्र काही दिवसांपासून फळांचा राजा मानला जाणाऱ्या आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर स्थिर
असून, ठिकठिकाणी आंब्याचे स्टॉल दिसत आहेत.
शहरात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच विविध प्रकारच्या आंब्याची आवक सुरू होते. कर्नाटकातील बदाम, लालबाग व पायरी यासह विविध जातींचे आंबे दाखल झाले होते. त्या वेळी काही ठिकाणच्या हापूस आंब्याची आवकही सुरू झाली होती. मात्र आवक कमी असल्याने दर अधिक होते. मागील आठवड्यापासून येथील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आंब्याची आवक वाढू लागली आहे. सध्या बाजारात हापूस आंब्याला पाचशे ते एक हजार रुपये डझन असा भाव मिळत आहे. सुरुवातीला ३५० रुपये किलो असलेला बदाम आंबा ८० ते १२० रुपये किलोवर आला आहे. पायरी १६० व लालबाग आंब्याची ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
सध्या हापूस आंब्याबरोबरच बदाम आंब्यालाही ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे. यावर्षी सुरुवातीच्या काळात बदाम आंब्याचा दरही ४०० रुपये किलो होता. मात्र आता कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील इतर भागांतून आंब्याची आवक झाल्याने आंब्याचे दर उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बदाम आंब्याची गोडी वाटत आहे.
आंबे खरेदीकडे कल वाढला आहे. गुढीपाढव्यानंतर अधिक आवक सुरू होईल. त्यानंतर यापेक्षा दर कमी होतील. वातावरणामध्ये काही बदल झाला किंवा अवकाळी पाऊस झाला तर त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पुन्हा आंब्याचे भाव वाढतील.
- कुमार शिरसाट, फळविक्रेते.