रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 07:32 PM2020-01-21T19:32:52+5:302020-01-21T19:45:09+5:30
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर अतिरिक्त जलउपसा करण्यात येणार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्धीकरण करण्याची स्थापित क्षमता ४२८ एमएलडी इतकी
पिंपरी : पवना धरण शंभर टक्के भरले असतानाही पाणी आरक्षण आणि पाणी उचलण्याची क्षमता कमी असल्याने महापालिकेस पाणी घेता येत नाही. त्यामुळे रावेत पंपगृहातील पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्याबरोबरच सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या विषयीच्या पन्नास कोटी रुपये खर्चास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी धरणात एकूण १८५.६७ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा आरक्षण मंजूर आहे. धरणातून नदीत पाणी सोडले जाते आणि रावेत येथील पात्रातून पाणी उचलण्यात येते. पाणी वाहून नेण्याची क्षमता लक्षात घेता प्रतिदिनी ४८० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सद्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्धीकरण करण्याची स्थापित क्षमता ४२८ एमएलडी इतकी आहे. जलउपसा केंद्रातून प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते.
त्यातही ओव्हर लोडींग करून ४८० एमएलडी इतके पाणी उचलले जाते. सन २०१९ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, मर्यादित क्षमतेमुळे महापालिकेला पाणी उचलता आले नाही. त्यामुळे पाणी उचलणे आणि शुद्धीकरण क्षमतेमध्ये वाढ केल्यास, ज्यावर्षी जादा पाऊस होईल, त्यावर्षी जास्त पाणी उचलणे शक्य होणार आहे. त्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर अतिरिक्त जलउपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनीही नदीची साठवण, क्षमता आणि प्रक्रिया यंत्रणा वाढविण्याच्या विषयास तरतूद उपलब्ध करून दिली होती. तसेच पाणीपुरवठा विभागाला तातडीने कामे करण्याचे आदेशही दिले होते.
जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार
रावेत येथील पंपिंग मशिनरी व जलशुद्धीकरण केंद्र यांची क्षमता वाढविण्याची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. या कामाचा समावेश महापालिकेच्या सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकात नसल्यामुळे अंदाजपत्रकातील विशेष योजना या लेखाशिषार्खाली रावेत येथील पंपिंग मशिनरी व सेक्टर क्रमांक २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणे, या कामाचा नव्याने समावेश करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी आवश्यक पन्नास कोटी रुपयांच्या खचार्चा विषय महापालिका सर्वसाधारण सभेसमोर ऐनवेळी दाखल करण्यात आला होता. त्यावर चर्चा होऊन या विषयास मंजुरी देण्यात आली आहे.