सक्तीमुळे उत्पन्नात झाली वाढ; मंदीतही बांधकाम परवान्यातून उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 03:23 AM2018-04-01T03:23:17+5:302018-04-01T03:23:17+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करवसुलीवर भर दिला होता. मिळकत, पाणी आणि बांधकाम परवना विभागाने गेल्या वर्षांत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. महापालिका करवसुलीत अव्वल ठरली आहे. सुमारे तीन हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करवसुलीवर भर दिला होता. मिळकत, पाणी आणि बांधकाम परवना विभागाने गेल्या वर्षांत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. महापालिका करवसुलीत अव्वल ठरली आहे. सुमारे तीन हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेची सूत्रे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारताच करातून उत्पन्न वाढीकडे लक्ष दिले आहे. तसेच गतिमान प्रशासनासाठी प्रयत्न केले आहेत. मिळकत आणि पाणीपट्टीच्या थकीत करवसुलीसाठी प्राधान्य दिले आहे. तसेच वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि दंवडीपिटणे, पथनाट्यांच्या माध्यमातून करवसुलीसाठी प्रयत्न केले आहेत. तसेच कारवाईचा बडगाही उघडल्याने मिळकतकराची विक्रमी वसुली झाली आहे. तसेच कर न भरण्याचे नळ जोड तोडणार असा इशारा दिल्याने मोठ्याप्रमाणावर वसुली झाली.
भारतीय जनता पक्षाची महापालिकेत आल्यानंतर राज्य शासनाचे एक परिपत्रक प्रशासनास दिले होते. त्यात शंभर टक्के करवसुलीला प्राधान्य द्यावे, तसेच उपाययोजना कराव्यात यांसदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी प्रत्येक विभागांना पत्र पाठविले होते. त्यामुळे मिळकतकर, पाणीपट्टी वसुलीला प्राधान्य दिले होते. मिळकतकर विभागाने शहरातील सुमारे सव्वा लाख थकबाकीदारांना नोटिसा दिल्या होत्या.
एलबीटी आणि मुद्रांक शुल्क, अनुदानातून महापालिकेला गेल्या वर्षी १४१० कोटी उत्पन्न मिळाले होते. यावर्षी १६२१ कोटी उत्पन्न मिळाले आहे. त्यात पावणे दोनशे कोटींची भर पडली आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
- मिळकतकरातही भर पडली आहे. गेल्यावर्षी ४५० कोटी उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ४८३.४६ कोटींची भर पडली आहे. ३३ कोटींनी उत्पन्न वाढले आहे. तसेच अवैध बांधकाम शास्ती वसुलीचे प्रमाणही वाढले आहे.
- महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे उत्पन्नही यावर्षी वाढले आहे. रेरा आणि जीएसटीचा परिणाम असतानाही मोठ्याप्रमाणावर बांधकामे वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. या विभागास ४२० कोटी उद्दिष्ट होते. ४५५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. सुमारे पस्तीस कोटींची भर पडली आहे, अशी माहिती सह शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.