शहरात साथीच्या आजारांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 05:20 AM2017-07-20T05:20:33+5:302017-07-20T05:20:33+5:30
पावसाळा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंगी, मलेरिया, थंडी ताप, स्वाइन फ्लू अशा साथीच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंगी, मलेरिया, थंडी ताप, स्वाइन फ्लू अशा साथीच्या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. स्वाइन फ्लूने या वर्षी पुन्हा डोके वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ आणि टायफाईडच्या रुग्णांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असली, तरी आरोग्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उद्योगनगरीची झपाट्याने वाढ होत असून, शहराची लोकसंख्या आता २२ लाखांवर पोहोचली आहे. रोजगार संधी उपलब्ध असल्याने लोकसंख्यावाढीचा वेग अधिक आहे. मात्र, त्या तुलनेत मूलभूत सुविधांच्या बाबतीत महापालिका यंत्रणा कमी पडत आहे. परिणामी शहराचे पर्यावरण बिघडून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच पावसाळ्यातील दूषित पाणी, सांडपाणी साचून साथीचे आजार झालेल्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. तसेच संसर्गजन्य रोगवाढीचे प्रमाण अधिक आहे. बदलत्या हवामानामुळे आजाराची संख्या वाढली आहे, असे महापालिकेचा पर्यावरण अहवाल सांगतो.
स्वाइन फ्लूने डोके वर काढले
प्रदूूषित पाण्याद्वारे गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड, जठराचा व आतड्याचा दाह, विषमज्वर हे रुग्ण वाढले आहेत. तसेच गेल्या काही वर्षात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. पावसाळ्यातील डासांमुळे होणारे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया हे साथीचे आजार नियंत्रणात आणल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तरी साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत.
डासांमुळे होणारे आजार ....
1) मलेरिया
लक्षणे - ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे
2) डेंगी
लक्षणे - ताप, स्नायू दुखणे, सांधे दुखी, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे
3)चिकुनगुनिया
लक्षणे - आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ्यांचा दाह होण
पावसाळ्यात होणारे आजार...
ताप : लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणे
लेप्टोस्पायरसिस : लक्षणे - थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काहीवेळा त्वचेवर रॅश येणे
स्वाइन फ्लू : लक्षणे - सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी
गॅस्ट्रो : लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकरा येणे, भूक मंदावणे
कावीळ : लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधे दुखी, ताप, उलट्या किंवा अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखी
टायफाईड : लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), सुस्तपणा येणे, उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणे
कॉलरा : लक्षणे - जुलाब, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखी
हे जरूर करा
पाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका
हे टाळा!
न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळा, पावसात अधिक काळ भिजू नका