सोसायटी बैठकांचा प्रभागात वाढला वेग
By Admin | Published: January 25, 2017 02:03 AM2017-01-25T02:03:27+5:302017-01-25T02:03:27+5:30
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटले असून, जोमाने प्रचाराला लागले आहेत.
रहाटणी : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटले असून, जोमाने प्रचाराला लागले आहेत. चार दिवसांनी निवडणूक अर्ज भरण्याला सुरवात होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीला मोठ्या प्रमाणात वेग आला असून, सर्वच प्रकारची चाचपणी करण्यासाठी व मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी इच्छुकांकडून कॉलन्यांमध्ये, सोसायटीमध्ये बैठका सुरू आहेत.
निवडणुकीचे बाशिंग गुडघ्याला बांधलेले अनेक इच्छुक रात्रीचा दिवस करून कामाला लागले आहेत. एका पक्षाचे कार्यकर्ते गेले की दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते हजर होत आहेत. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अशा बैठकांचे आयोजन केले जात आहे. दिवसभर महिला बचत गटाच्या महिलांच्या वेगळ्या बैठका, तर रात्री पुरुषांच्या बैठका असा दिनक्रम सुरु असल्याने मतदारही गोंधळात पडला आहे. कोणाला हो म्हणावे व कोणाला नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हीच आमचे म्हणण्याची वेळ मतदारावर आली आहे. अजून सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर होणे आहे. तरी संभाव्य उमेदवार म्हणून विविध पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक कॉलनी, सोसायटी गावठाण अशा ठिकाणी जाऊन संवाद साधत आहेत. जे कार्यकर्ते किंवा जे इच्छुक आहेत ते कधी कॉलनीत किंवा सोसायटीमध्ये आलेही नव्हते किंवा त्यांना हे माहीतच नाही असे अनेक इच्छुक उमेदवार दिसला माणूस की नमस्कार, हात जोडून नतमस्तक होत आहेत. गाडीची काच कधी खाली न करणारेही सध्या गल्ली-गल्लीत पायी फिरत आहेत. (वार्ताहर)