मावळात वाढला पावसाचा जोर : धुवाधार पावसाने पूल गेले पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 01:21 AM2018-07-08T01:21:25+5:302018-07-08T01:22:25+5:30
मावळासह कामशेत परिसरात पावसाने चांगलीच ओढ दिल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून जोरात सुरुवात केली आहे.
कामशेत - मावळासह कामशेत परिसरात पावसाने चांगलीच ओढ दिल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून जोरात सुरुवात केली आहे. यामुळे सांगिसे, जुना नाणे रोड, सांगवडे येथील पूल पाण्याखाली गेले. तसेच पुसाणे येथील सांडव्यावरून पाणी गेले. यामुळे दळणवळण ठप्प झाले.
कुंडलिका व इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली असून, इंद्रायणी नदीवरील जुना नाणे पूल पाण्याखाली गेला आहे. कामशेत परिसरात मागील दोन दिवसांमध्ये १३२ मिमी पाऊस झाला असल्याची माहिती खडकाळा बीज गुणन प्रक्षेत्र कृषी विभागाने दिली.
कामशेत शहरासह मावळातील अनेक भागांत दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात होते. पण या वेळी पावसाने जास्तच ओढ देऊन सर्वांचे डोळे आभाळाकडे लावले होते. भात उत्पादक शेतकरी वर्ग धास्तावला होता. एकीकडे यावर्षी पाऊस जास्त होणार असे बोलले जात होते, तर दुसरीकडे मावळात पाऊस सुरू व्हायचे नाव घेत नव्हता. यामुळे नागरिकांची शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. शेतीची सर्व कामे खोळंबली होती. पण जुलै महिन्यापासून शहरासहीत मावळातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावून सर्वांना सुखावले. तीन ते चार दिवसांत पावसाचा चांगलाच जोर वाढला असून, शेतात व ठिकठिकाणी पाणी साचले आहे. नाणे मावळाकडे जाणाºया नाणेरोड वरील इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहायला लागली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला ऊन पावसाचा खेळ सुरू होता. पावसाची संततधार सुरू असतानाच मागील तीन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. मावळातील सर्वच भागात पावसाला सुरुवात झाली असून, इंद्रायणी दुधडी भरून वाहू लागली आहे. नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले. इंद्रायणी नदीचे पात्र काठोकाठ भरले आहे. वाहून आलेल्या जलपर्णी जुन्या पुलाच्या कठड्यांना अडकल्या आहेत. नदीचे पाणी अलीकडे कामशेत शहराची स्मशानभूमीच्या पाय-यांना लागले असून, पलीकडे नाणे गावच्या स्मशानभूमीला पाणी लागले आहे. नाणेरोडच्या बाजूने असणाºया मोºया तुडुंब भरून वाहत आहेत.
कामशेतमधून लोणावळ्याकडे जाणारा महामार्गाला जोडणाºया शायीरी भागातील रस्त्यावर पाणी साचले असून, या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विशेष करून खामशेत, पाथरगाव, वाडीवळे भागातील विद्यार्थ्यांना रस्त्यावरील पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.