चिंचवडमधील रस्त्यांवर वाढले अतिक्रमण
By admin | Published: March 30, 2017 02:24 AM2017-03-30T02:24:29+5:302017-03-30T02:24:29+5:30
पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष आणि वाहतूक शाखेचे अभय यामुळे चिंचवडमधील बहुतांश चौक आणि
चिंचवड : पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष आणि वाहतूक शाखेचे अभय यामुळे चिंचवडमधील बहुतांश चौक आणि रस्त्यांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. सुसज्ज रस्ते बनविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र याच रस्त्यांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण होत असल्याचे वास्तव सध्या चिंचवडमध्ये दिसत आहे. यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि पादचाऱ्यांची गैरसोय याबाबत नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
चिंचवडमधील चापेकर चौक, अहिंसा चौक आणि पुणे-मुंबई महामार्ग या भागात रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण ही गंभीर बाब आहे. अत्यंत वर्दळीचा असणारा चापेकर चौक सध्या वाहतूककोंडीमुळे त्रासदायक ठरत आहे. परिसरातील सर्वच रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. येथील रस्ते पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहेत. यामुळे या भागात वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. येथील रस्त्यांवरून चालणे अवघड झाले आहे. अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष असल्याने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे.
पुणे-मुंबई महामार्गाकडून चिंचवडगावाकडे येणाऱ्या दोन्ही मार्गांवर सम-विषम पार्किंग झोन ठरविण्यात आला आहे. मात्र वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहन पार्क करीत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. या भागात उभ्या असणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन परिसरातील पादचारी मार्ग व मुख्य रस्त्यावरही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. येथील मुख्य रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी केली
जातात. (वार्ताहर)
वाहतूक विभाग गप्प का?
अहिंसा चौकातही परिस्थिती गंभीर आहे. सायंकाळी या चौकात अनेक खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या केल्या जातात. यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक समस्या नित्याचीच झाली आहे. परिसरात अनेक नामांकित बँका, मोठे व्यावसायिक व शोरूम असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्स गाड्या या भागात उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. या भागात पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नाही. चिंचवड वाहतूक विभागाचेही या प्रकारात दुर्लक्ष आहे. याबद्दल नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.