‘स्वाइन फ्लू’ची वाढली डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:35 AM2018-08-23T03:35:53+5:302018-08-23T03:36:18+5:30
पाच दिवसांत दोघांचा मृत्यू, रुग्णांच्या संख्येत वाढ; नागरिकांत भीती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एच १ एन १ या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या पाच दिवसांत तब्बल ११ रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत.
एच १ एन १ या आजाराने काळेवाडी येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला. या व्यक्तीला १४ आॅगस्टला उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. तर पाच दिवसांपुर्वीच लाजेवाडी येथील ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
१ जानेवारीपासून अद्यापपर्यंत ३ हजार ७७७ जणांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये अद्यापपर्यंत एकूण २२ रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एच१ एन१ चा संशयित रुग्ण आढळून आल्यास किंवा या आजारासारखे लक्षणे एखाद्या रुग्णामध्ये दिसून आल्यास अशा रुग्णांना तातडीने टॅमीफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात. गरोदर माता व अतिजोखमीच्या रुग्णांना आयएलआय लक्षणे आढळून आल्यास तातडीने एच१ एन१ ची प्रतिबंधात्मक लस द्यावी.
महापालिकेच्या रुग्णालयात, दवाखान्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत असून, त्यामध्ये उपस्थित नागरिकांना एच१ एन१ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत माहिती दिली जाईल. खासगी रुग्णालयातील डॉक्टर यांच्या करिता एच१ एन१ या आजाराबाबत माहिती व प्रशिक्षण सत्र आयोजित करणेबाबत कळविले असून, एच१ एन१ बाधित संशयित रुग्णांसाठी विलीगीकरण कक्ष व आवश्यकतेनुसार आयसीयू विभाग उपलब्धतेनुसार तयार ठेवण्याबाबत सूचित केले आहे. या आजाराकरिता आवश्यक टॅमीफ्लू / लस याची कमतरता होणार नाही याची दक्षता घेणेबाबत कळविले आहे. वायसीएम रुग्णालयात एच१ एन१ संशयित किंवा बाधित रुग्ण दाखल
झाल्यास प्राधान्याने तशा रुग्णांकरिता आयसोलेशन वॉर्ड उपलब्ध करून देणे तसेच बाधित रुग्णांना आयसीयू विभागामध्ये खाटा प्राधान्याने देण्यात याव्यात, आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांसाठी खबरदारीचे उपाय
सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होईपर्यंत घरातून बाहेर पडू नये. जनसंपर्क टाळावा.
खोकताना, शिंकताना नाकातोंडावर रुमाल धरावा.
डॉक्टरांनी दिलेल्या औषधांशिवाय गरम पाण्यात मीठ, हळद, टाकून गुळण्या करणे. गरम पाण्याची वाफ घेणे असे घरगुती उपायही करावेत. घरातील टेबल, संगणकाचा की बोर्ड यांसारखे पृष्ठभाग वारंवार स्वच्छ करावेत.
वारंवार हात साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी शारीरिक, मानसिक ताण टाळावा, पुरेशी विश्रांती घ्यावी. आरोग्यदायी आहार घ्यावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या सी व ई-व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
रुग्णालय प्रमुखांना सूचना
या आजाराला आळा घालण्यासाठी रुग्णालय प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी आपल्या अखत्यारित असलेल्या कर्मचाºयांना एच १ एन १ आजाराविषयी माहिती देऊन प्रशिक्षण आयोजित करावे. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, गणपती मंडळ, महिला बचत गट व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवावा.
सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होईपर्यंत घरातून बाहेर पडू नये. जनसंपर्क टाळावा. खोकताना, शिंकताना नाकातोंडावर रुमाल धरावा. आरोग्यदायी आहार घ्यावा. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी