चोरट्यांकडून मंगल कार्यालये टार्गेट, वाकड परिसरातील वाढत्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:20 AM2018-01-02T02:20:46+5:302018-01-02T02:20:56+5:30
लग्न समारंभासाठी सातारा येथून वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे एक लाख पाच हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना मागील आठवड्यात घडली.
पिंपरी : लग्न समारंभासाठी सातारा येथून वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे एक लाख पाच हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना मागील आठवड्यात घडली. ही घटना ताजी असतानाच, काळेवाडीतील महाडिक कुटुंबीयांना ताथवडे येथील मंगल कार्यालयात चोरट्यांचा असाच कटू अनुभव आला. सोनसाखळी हिसकावणाºया चोरट्यांनी मंगल कार्यालयांकडे आपला मोर्चा वळविला असून, मंगल कार्यालयाच्या परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरी होत असताना, मंगल कार्यालयातही चोरटे दागिन्यांवर डल्ला मारू लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
सातारा येथून शोभा शिंदे या नातेवाइकांच्या लग्नसमारंभासाठी पुण्यात वाकड येथे आल्या. काळाखडक झोपडपट्टी जवळील कार्यालयात लग्न होते. मंगल कार्यालयाजवळच मुंजोबानगर गल्ली नं़ २ येथे नवºया मुलाचे घर असल्याने त्या दुपारी लग्नघरी पायी जात होत्या. तेवढ्यात तेथे दुचाकींवरून आलेल्या चोरट्यांनी चपळाईने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.
मंगल कार्यालयातून दोन लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली असून, लग्न समारंभात तरी महिलांनी दागिने वापरावेत की नाही? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. लगीनघाईचा फायदा घेत चोरट्याने रोख रकमेसहित दोन लाखांचा ऐवज असलेली पर्स पळवून नेली. ही घटना ताथवडे येथील मंगल कार्यालयात घडली. राजेंद्र रामचंद्र महाडिक (वय ५४, रा. जोतिबानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दिली. ताथवडे येथील मंगल कार्यालयात नातेवाइकांच्या लग्नाला गेलेले असताना महाडिक यांच्या पत्नीने त्यांची पर्स मंगल कार्यालयाच्या एका खोलीत ठेवली होती. काही कामानिमित्त त्या खोलीतून बाहेर गेल्या असता चोरट्याने ती पळवली. पर्समध्ये १ लाख ५२ हजार रुपये रोख व दीड तोळ्यांची सोनसाखळी असा एकूण १ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज होता.
सुरक्षा व्यवस्था अपुरी : प्रवासी महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास
उपळाई, बार्शी येथून अरुंधती नवनाथ गटकुल (वय ६५) ही महिला पाहुण्यांकडे आली. ताथवडे बस थांब्यावर उतरून रिक्षाने नातेवाइकांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी पर्स तपासली असता, १ लाख ८६ हजार २५० रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाकड, ताथवडे भागात अन्य ठिकाणाहून येणाºया पाहुण्या महिलांच्या सोनसाखळी आणि दागिन्यांची चोरी होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मंगल कार्यालयामध्ये लग्नासाठी येणाºया कोणत्याही पाहुण्यांची नोंद केली जात नाही. मुलाकडचे पाहुणे व मुलीकडचे पाहुणे कोणते हे दोघांकडील प्रमुखांना माहिती नसते. त्यामुळे कार्यालयामध्ये चोरटे बिनधास्तपणे घुसतात.