उमेदवारांची वाढली घालमेल
By admin | Published: February 23, 2017 03:07 AM2017-02-23T03:07:19+5:302017-02-23T03:07:19+5:30
महापालिका निवडणुकीचे मतदान झाले. आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, क्रॉस व्होटिंग
पिंपरी : महापालिका निवडणुकीचे मतदान झाले. आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, क्रॉस व्होटिंग झाल्याने कोणाला फटका बसणार, पॅनल टू पॅनल किती उमेदवार निवडून येतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज मतमोजणीवेळी मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांची उत्कंठा वाढली आहे. निवडणूक लढण्यासाठी सर्व काही पणाला लावले. मतदार काय कौल देणार, याबद्दल मनात शंका-कुशंका निर्माण होऊ लागल्याने उमेदवारांची घालमेल वाढली आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आचारसंहिता लागू होताच, निवडणुकीचे वातावरण तापू लागले. त्यानंतर प्रचार सुरू झाला. प्रचाराची रणधुमाळी दोन दिवसांपूर्वी संपली. पाठोपाठ मतदानही झाले. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. त्यामुळे सर्वांनाच निकालाची उत्कंठा लागून राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १२४ उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाचे १२६, शिवसेनेचे ११९, काँग्रेसचे ५९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३७, एमआयएमचे १४, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे १०, समाजवादी पार्टीचे ४, बहुजन समाज पार्टीचे १८, भारीप बहुजन महासंघाचे ६, बहुजन मुक्ती पार्टीचे ६, जनता दल सेक्युलरने १, भारतीय शेतकरी कामगार पक्षचा १, आरपीआय आठवले गटाचे ६,रिपब्लिकन सेनेचा १, भारतीय नवजवान सेनेचा १, सीपीआय (एम)चे ३, रासचा १ आणि अपक्ष २३६ असे एकूण ७७४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ईव्हीएम यंत्रावर मतदारांनी नोंदविलेल्या मतानुसार त्यांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे. (प्रतिनिधी)
८९ विद्यमान रिंगणात
४महापालिका निवडणुकीत दोन स्वीकृत सदस्यांसह ८९ विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादीचे ४७, भाजपाच्या तिकिटावर १९, शिवसेनेकडून ११, कॉँग्रेसकडून २, मनसेकडून एक, तर ९ अपक्षांचा समावेश आहे. माजी महापौर आर. एस. कुमार हे सातव्यांदा, योगेश बहल व भाऊसाहेब भोईर हे सहाव्यांदा, मंगला कदम व वसंत लोंढे हे पाचव्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांपैकी किती जणांना पुन्हा संधी मिळेल.