हवामानाच्या बदलामुळे नागरिक हैराण, रुग्णांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:59 AM2019-02-05T00:59:59+5:302019-02-05T01:00:12+5:30
मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीचे अचानक प्रमाण वाढले. मात्र नंतर थंडी सौम्य झाली.
कामशेत - मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीचे अचानक प्रमाण वाढले. मात्र नंतर थंडी सौम्य झाली. मात्र पुन्हा एकदा तीन ते चार दिवस थंडीचा कडाका रात्र अन् दिवस तसाच राहिला. मागील दोन दिवसांपासून ही कडाक्याची थंडी अचानक गायब झाली.
रात्रीची थंडी आणि दुपारचे कडक ऊन अशी परिस्थिती असतानाच रविवारी सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. वातावरणात कमालीचा बदल झाला असून, परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून मावळ तालुक्यातील वातावरणात मोठा बदल होत आहे. अचानक होणाऱ्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याचा प्रामुख्याने लहान मुले, वयोवृद्ध व महिलांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. आता रात्रीची थंडी आणि दिवसा कडक ऊन असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, प्रत्येक घरात एखाद-दोन पेशंट दिसत आहेत. यात प्रामुख्याने अंगदुखी, सांधेदुखी, ताप, सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, पोटाचे विकार आदी आजारांच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत झाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. यात प्रामुख्याने मुले, वयोवृद्ध व महिलांचे प्रमाण मोठे आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी व कचºयाची समस्या गंभीर असल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. यात ताप, थंडी, सर्दी, खोकला, अंगदुखी आदी आजारांचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत. स्वाइन फ्लू, डेंगी, मलेरिया, टायफॉईड आदींच्या भीतीने नागरिक आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांकडे धाव घेताना दिसत आहेत. मंडळी बाधित होत असून, वयोवृद्ध व लहान मुलांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होत आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू आहेत. या गृहप्रकल्पावर अनेक मजूर काम करत आहेत. त्यांना निवारा शेडमध्ये रात्र काढावी लागते.अनेक वेळा त्यांना थंडीमध्ये कुडकुडत पडावे लागत आहे. तसेच प्राण्यांना आणि पक्ष्यांवरही बदलत्या हवामानाचा परिणाम होत असल्याचे जाणवत आहे.
विकेश मुथा : मुलांच्या आरोग्यावर परिणाम
मागील तीन ते चार दिवसांपासून थंडी व कडक ऊन यामुळे रोगसदृश वातावरण तयार झाले आहे. विषाणूंच्या वाढीसाठी असे बदलते वातावरण पोषक असते. शरीराच्या तापमानात सतत बदल होत असल्याने प्रतिकारशक्ती कमी होते. त्यातून विषाणूंचा संसर्ग होतो. अशा बदलणाºया वातावरणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या व वयोवृद्धांच्या आरोग्यावर होतो. तसेच सांधेदुखी, संधिवात या आजारांच्या रुग्णांचा त्रास वाढतो.
डॉ. विकेश मुथा