वेतनवाढ करार अखेर मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 06:10 AM2017-07-22T06:10:11+5:302017-07-22T06:10:11+5:30
टाटा मोटर्स कंपनीतील कार विभागातील २२०० कामगारांना वेतनवाढ देण्यात आली. १७ हजार ३०० रुपयांची वेतनवाढ मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : टाटा मोटर्स कंपनीतील कार विभागातील २२०० कामगारांना वेतनवाढ देण्यात आली. १७ हजार ३०० रुपयांची वेतनवाढ मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगार संघटनेतील
आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या वादामुळे वेतनवाढीचा प्रश्न
रखडला होता. ज्यांच्यात वाद
आहेत असे पदाधिकारी बाजूला ठेवून अखेर गुरुवारी हा वेतनवाढ करार करण्यात आला.
कार विभागातील कामगारांची रखडलेली वेतनवाढ मार्गी लागण्यासाठी हालचाली सुरू असल्याबाबतचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानुसार गुरुवारी हा करार पार पडला. मार्च महिन्यात झालेल्या कराराने सीयूव्ही प्लँटमधील सुमारे साडे पाच हजार कामगारांना वेतनवाढीचा लाभ मिळाला. मात्र, कार प्लँटमधील उर्वरित २२०० कामगार या लाभाच्या प्रतीक्षेत होते. संघटनेच्या अध्यक्षपदावरून वाद असल्याने नेमका करार कोणाशी करायचा असा मुद्दा कंपनी व्यवस्थापनाने उपस्थित केला होता. कामगार संघटनेचे नेमके अध्यक्ष कोण यावरून त्यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू होते. अखेर ज्यांचे वाद आहेत. ते पदाधिकारी बाजूला ठेवून तोडगा काढण्यात आला. त्यानुसार अन्य नऊ कामगार प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. व्यवस्थापनाकडून कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर या वेळी उपस्थित होते. या करारानुसार दोन हजार २०० कामगारांना १७ हजार ३००
रुपयांची वेतनवाढ देण्यात आली. करार झाल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. रखडलेला करार मार्गी लागल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला.
मानद अध्यक्षांच्या शिष्टाईने करार मार्गी
टाटा मोटर्स कंपनीतील कामगार व व्यवस्थापनातील संघर्ष १९
महिने सुरू होता. टाटा उद्योग समुहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी शिष्टाई केल्याने मार्च महिन्यात मार्ग निघाला होता. त्यामुळे
साडेपाच हजार कामगारांना १७ हजार ३०० रुपये वाढ मिळाली. या कारारानंतर आठवड्याभरात कार विभाग आणि टाटा आॅटोमेशन
लिमिटेड विभागाचा वेतनवाढ करार करण्यात येतो. मात्र, या विभागांचा करार होत नव्हता.