अपक्ष बाबूराव वायकरांनी मारली बाजी
By admin | Published: February 24, 2017 02:43 AM2017-02-24T02:43:37+5:302017-02-24T02:43:37+5:30
वडगाव खडकाळा जिल्हा परिषदेच्या गटात अपक्ष उमेदवार बाबूराव वायकर यांनी बाजी मारली असून
वडगाव मावळ : वडगाव खडकाळा जिल्हा परिषदेच्या गटात अपक्ष उमेदवार बाबूराव वायकर यांनी बाजी मारली असून, वडगाव व खडकाळा पंचायत समिती गणात भाजपने यश मिळविले.
वडगाव गणात भाजपचे गुलाबराव म्हाळसकर व खडकाळा गणात सुवर्णा कुंभार विजयी झाल्या.
तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा वडगाव खडकाळा गटात अपक्ष उमेदवार वायकर यांनी राष्ट्रवादीचे सुनील ढोरे व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रामनाथ वारिंगे यांचा १९०९ मतांनी पराभव केला. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राष्ट्रवादीने या गटात तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांच्या मुलाला बाबूराव वायकर यांना डावलून तिकीट दिले होते. त्यामुळे वायकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीचे अनेक नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वायकर यांना छुपे समर्थन केल्याने, तसेच शिवसेनेने ऐनवेळी या गटातील आपला उमेदवार अनिकेत घुले यांचा अर्ज माघारी घेऊन वायकर यांना पाठिंबा दिल्याने वायकर यांचा विजय सोपा झाला होता. त्यात वायकर यांनी अत्याधुनिक प्रचार यंत्रणा राबून या गटातील प्रत्येक प्रभागातील राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने फिरवले. याचाच मोठा फटका राष्ट्रवादीला बसला.
निकालाच्या पहिल्या फेरीपासूनच वायकर यांनी आघाडी घेऊन शेवटपर्यंत टिकविली. वडगाव व ग्रामीण भागात वायकर यांना चांगले मतदान झाल्याने त्यांचा विजय सुकर झाला. अपक्ष वायकर आणि राष्ट्रवादीचे ढोरे यांच्यातच लढत पाहायला मिळाली.
वडगाव गणात भाजपाचे गुलाबराव म्हाळसकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश आगळमे यांचा १६५० मतांनी पराभव केला. सुशिक्षित व मनमिळाऊ म्हाळसकर यांना मतदारांनी कौल दिला. पंचायत समितीवरील भावी सभापती म्हणून गुलाबराव म्हाळसकर यांचे नाव निश्चित मानले जात आहे. म्हाळसकर व प्रकाश आगळमे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यात शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये म्हाळसकर आघाडी घेऊन विजयी झाले. (वार्ताहर)
खडकाळा गणात भाजपच्या सुवर्णा कुंभार यांनी राष्ट्रवादीच्या कविता काळे यांचा ११७० मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासूनच कुंभार यांनी आघाडी घेऊन सहज विजय मिळविला. दोन्हीही उमेदवार कामशेत शहरातील असून, नात्यागोत्याचे असल्याने मतदारांचा मोठा गोंधळ झाला होता. पण मतदारराजाने कुंभार यांना विजयी केले.
उमेदवार गट व गणनिहाय खालीलप्रमाणे :
वडगाव खडकाळा गट : १. बाबूराव आबाजी वायकर, अपक्ष (१०३८९, विजयी) २. रामनाथ विष्णू वारिंगे, भाजपा (८४८०)
वडगाव गण :१) गुलाबराव गोविंद म्हाळसकर, भाजपा (६७०६, विजयी)
२) प्रकाश शंकर आगळमे, राष्ट्रवादी (५०५६).
खडकाळा गण : १) सुवर्णा संतोष कुंभार,भाजपा (४५९६)
२) कविता संतोष काळे , राष्ट्रवादी (३४२६)