शहरासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरण; महापौरांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 02:38 AM2018-11-02T02:38:20+5:302018-11-02T02:38:35+5:30
महापालिकेचे दिवाळे, ठेकेदारांची होतेय दिवाळी
- हणमंत पाटील
पिंपरी : महापालिकेच्या स्थापनेपासून पिंपरी-चिंचवड शहरासाठी फ्लेक्स व होर्डिंगचे स्वतंत्र धोरण नाही. त्याचा गैरफायदा होर्डिंगचे ठेकेदार व कंपन्या घेत आहेत. शहरासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरणाचा प्रस्ताव करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. धोरणानंतर महापालिकेच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल, असा दावा महापौर राहुल जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.
महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला आहे. मात्र, प्रशासनाचे कामकाज स्मार्ट झालेले दिसत नाही. सद्य:स्थितीत सुमारे २२ लाख लोकसंख्येच्या आणि झपाट्याने विस्तारणाऱ्या शहरासाठी अद्याप होर्डिंग धोरण नाही. त्याचा गैरफायदा ठेकेदार घेत आहेत. यावर ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाश टाकला होता.
परवाना एक, होर्डिंग अनेक
महापालिकेकडे धोरण नसल्याने पूर्वीच्या नियमावलीतील त्रुटीचा फायदा ठेकेदार उठवीत आहेत. एका होर्डिंगचा घेऊन परवाना घेऊन त्या परवान्यावर चार ते पाच होर्डिंग अनधिकृतपणे उभारली जात आहेत. त्यामुळे ठेकेदारांचा खिसा भरत असला, तरी महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे.
स्मार्ट सिटीचे विद्रूपीकरण
४शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर बिनधास्त व राजरोसपणे अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स वा किआॅक्स उभारले जात आहेत. वेडेवाकडे, लहान-मोठे, बटबटीत अशा या फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधक असे सर्वपक्षीय नगरसेवक यावर मूग गिळून बसल्याची वस्तुस्थिती समोर आहे.
अधिकाऱ्यांशी संगनमत
अनधिकृत होर्डिंगबाजीने शहराचे विद्रूपीकरण होत असल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. शिवाय शहर विद्रूपीकरणांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश महापालिका अधिकारी व पोलिसांना दिला आहे. मात्र, अधिकाºयांचेच ठेकेदारांशी संगनमत असल्याने ते गुन्हा दाखल करीत नाहीत.
स्वतंत्र होर्डिंग धोरण नसल्याने महापालिकेच्या उत्पन्नात घट होत आहे. त्याचा फायदा इतरांना होऊ नये यासाठी स्वतंत्र होर्डिंग धोरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
- राहुल जाधव, महापौर