आपत्कालीनसाठी स्वतंत्र सुविधा, इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर रिफ्युजी क्षेत्र सोडणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:59 AM2018-04-16T02:59:25+5:302018-04-16T02:59:25+5:30

इमारतीची उंची ७० मीटरपेक्षा अधिक अथवा २४ मजल्यांची इमारत असेल, तर एकूण बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत चार टक्के जागा रिफ्युजी क्षेत्र म्हणून सोडले जाते. आगीची घटना अथवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना मदत मिळू शकेल या दृष्टीने रिफ्युजी क्षेत्र सोडणे बांधकाम नियमावलीने बंधनकारक करण्यात आले आहे.

 Independent facility for emergency, restriction on leaving the Refugee Area on the seventh floor in the building | आपत्कालीनसाठी स्वतंत्र सुविधा, इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर रिफ्युजी क्षेत्र सोडणे बंधनकारक

आपत्कालीनसाठी स्वतंत्र सुविधा, इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर रिफ्युजी क्षेत्र सोडणे बंधनकारक

Next

पिंपरी - इमारतीची उंची ७० मीटरपेक्षा अधिक अथवा २४ मजल्यांची इमारत असेल, तर एकूण बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत चार टक्के जागा रिफ्युजी क्षेत्र म्हणून सोडले जाते. आगीची घटना अथवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना मदत मिळू शकेल या दृष्टीने रिफ्युजी क्षेत्र सोडणे बांधकाम नियमावलीने बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता उंच इमारतींमध्ये रिफ्युजी क्षेत्र असल्याचे फलक संबंधित ठिकाणी दर्शनी भागावर लावल्याचे दिसून येत आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत अधिक उंचीच्या इमारती दिसून येऊ लागल्या आहेत. मुंबईसारखे इमारतीचे इमले इथे दिसून येत नव्हते. मात्र गेल्या दहा वर्षांत बांधकाम व्यवसायाला या भागात चालना मिळाली. दहा वर्षांपूर्वी शहरात बहुतांश चार मजली इमारती होत्या. या इमारतींना लिफ्ट सुविधा नव्हती. सात मजल्यांच्या इमारतींना लिफ्ट सुविधा बंधनकारक असल्याने बहुतांश बांधकाम व्यावसायिक चार मजली इमारतीस प्राधान्य देत होते. अलीकडच्या काळात ७० मीटरपर्यंत उंच इमारतींना परवानगी मिळू लागली. वाढीव एफएसआय, टीडीआर मंजूर होऊ लागला. त्यामुळे कमीत कमी जागेत उंच इमारती बांधणे बांधकाम व्यावसायिकांना सोईस्कर ठरू लागले आहे. पिंपरी, चिंचवड, वाकड, भोसरी, सांगवी, हिंजवडी परिसरात टॉवर उभारल्याचे दृष्टिपथास येऊ लागले आहे. जसे सात मजल्यांच्या इमारतींना लिफ्ट सुविधा बंधनकारक, तसेच २४ मजल्यांपासून ते ७० मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना ‘रिफ्युजी क्षेत्र’ स्वतंत्र जागा सोडणे बंधनकारक केले आहे. सुविधा नसेल, तर पूर्णत्वाचा दाखला मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. पूर्णत्वाचा दाखला मिळण्यास अडचणी येऊ नयेत, यासाठी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

उंच इमारतीत २४ मीटरनंतरच्या उंचीवर प्रत्येक सातव्या मजल्यावर ‘रिफ्युजी क्षेत्र’ याकरिता विशिष्ट आकाराची स्वतंत्र जागा सोडणे आवश्यक आहे. ३० मीटरपेक्षा अधिक उंच इमारतीत पहिले ‘रिफ्युजी क्षेत्र’ २४ मीटरवर असावे, असे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नव्याने होणाºया गृहप्रकल्पांमध्ये ‘रिफ्युजी क्षेत्र ’ असे फलक झळकताना दिसून येत आहेत.

नेमके काय आहे रिफ्युजी क्षेत्र?

इमारतीची रचना केली जात असताना, आपत्कालीन परिस्थितीत उंच इमारतीतील नागरिकांना मदत कशी देता येईल. आग अथवा अन्य प्रकारची आपत्कालीन स्थिती ओढवल्यास इमारतीतील रहिवाशांना एका ठिकाणी जमा होता येईल. त्या ठिकाणी बाहेरून मदतीसाठी पाचारण केलेली यंत्रणा त्यांना मदत मिळवून देऊ शकेल. इमारतीच्या खालून वरपर्यंत रिफ्युजी क्षेत्रापर्यंत मोठी शिडी अथवा दोरखंड बांधून इमारतीतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न करता येतील. संकटसमयी इमारतीतील रहिवाशांनी इतरत्र सैरभैर धावाधाव करण्यापेक्षा विशिष्ट अशा एका ठिकाणी एकत्र यावे, याकरिता उपलब्ध करून दिलेली जागा यालाच रिफ्युजी क्षेत्र म्हटले जाते.

सात मजल्यांच्या लिफ्ट कुचकामी
सात अथवा त्याहून अधिक मजल्यांच्या इमारतींना लिफ्ट सुविधा पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सात मजल्यांच्या प्रत्येक इमारतीला लिफ्ट सुविधा आहे. परंतु अनेक इमारतींच्या लिफ्ट नादुरुस्त आहेत. महापालिकेने झोपडीवासीयांचे पुनर्वसन करण्यासाठी बांधलेल्या इमारतींना लिफ्ट सुविधा आहे. या इमारतींमधील देखभाल-दुरुस्ती खर्च झोपडीतून इमारतीत आलेल्या झोपडीवासीयांना परवडत नाही. त्यामुळे पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींना असलेली लिफ्ट सुविधा कुचकामी ठरू लागली आहे.

Web Title:  Independent facility for emergency, restriction on leaving the Refugee Area on the seventh floor in the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.