भारताने स्वत:ची उपचार पद्धती विकसित करणे आवश्यक : भूषण पटवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 05:12 PM2019-04-15T17:12:32+5:302019-04-15T17:13:20+5:30
जागतिक आरोग्य संस्थेने आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाची स्वतंत्र ओळख निश्चित केली आहे.
पिंपरी : केवळ आधुनिक उपचार पद्धतीत वैद्यकीय शाखेच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. आयुर्वेद आणि योगा या पारंपरिक उपचार पद्धतीलाही मयार्दा आहेत. त्यामुळे पारंपरिक व आधुनिक उपचार पद्धती एकत्रित करून भारताने स्वत:ची उपचार पद्धती विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते झाला. या वेळी डॉ. पटवर्धन बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, संत श्रीमान सुमन भाई, कुलाधिपती मौनीथर्थ, माजी मंत्री बी. जे. खताल पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पटवर्धन म्हणाले, जागतिक आरोग्य संस्थेने आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाची स्वतंत्र ओळख निश्चित केली आहे. त्यानुसार प्राधान्यक्रम लक्षात घेऊन प्रत्येक देशाने स्वत:ची उपचार पद्धती विकसित करणे आवश्यक आहे. भारताने आपली उपचार पद्धती विकसित करताना आपली संस्कृती आणि परंपरांचा विचार करून आयुषचा समावेश करावा. आयुषमुळे लोकांना आपल्या आरोग्याची आजार होण्यापूर्वीच काळजी घेता येईल.
डॉ. पटवर्धन म्हणाले,आहार, जीवनशैली, मनोबल आणि स्वत: बरे होण्याची क्षमता याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वैयक्तिक आरोग्याबरोबर सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आधुनिक व पारंपरिक उपचार पद्धती एकत्रित आल्याने आयुर्मान वाढू शकेल. या कार्यक्रमात १४०१ विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या पदव्या बहाल करण्यात आल्या. त्यामध्ये मेडिसीन, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी, नर्सिंग, ऑप्टोमेट्री, बायोटेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट डिस्टन्सलर्निंग या विभागांचा समावेश होता. २४ मानांकित विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके आणि २५ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली. डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीसाठी संत श्री सुमन भाई आणि बी. जे. खताल पाटील यांना सुवर्णपदके बहाल केली. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले.