मोशीत रंगणार भारत विरुद्ध इराण मल्लयुद्ध; महापालिकेची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:43 PM2017-10-14T14:43:48+5:302017-10-14T14:47:04+5:30
मोशी येथील कृषी प्रदर्शन मैदानावर उभारलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात रविवारी दुपारी दोन वाजता आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
पिंपरी : महापालिकेच्यावतीने आणि पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. मोशी येथील कृषी प्रदर्शन मैदानावर उभारलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात रविवारी दुपारी दोन वाजता आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने आखाड्यावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कुस्ती स्पर्धेत इराणचे रैझाहैदरी, सईद मोहम्मद घोली, जावेद शबानी, जलाल शबानी हे इराणचे मल्ल सहभागी होणार आहेत. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हणुमंत गावडे यांनी स्पर्धेची माहिती दिली. भारत विरूद्ध इराण असे मल्लयुद्ध पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात रंगणार आहे.
महापालिका, जयगणेश युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हिंद केसरी जोगिंदर कुमार, राष्ट्रीय पदक विजेते प्रसाद सस्ते, राजू हिप्परकर, किरण भगत, हिंद केसरी जस्सा पट्टी, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रविण भोला, भारत केसरी प्रवेश कुमार हे देशातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत प्रमुख १४ कुस्त्या होणार आहेत. इराणचा मल्ल रैजा हैदरी याच्याशी हिंद केसरी जोगिंदर सिंग याची लढत होणार आहे. सईद मोहम्मद घोली याच्याशी प्रसाद सस्ते, जावेद शबानी विरूद्ध राजू हिप्परकर तसेच जलाल शबानी विरूद्ध राहुल आवारे लढत देणार आहे.
महापालिकने ७० बाय ७० मीटरचे भव्य असे मातीचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. स्वतंत्र विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. २० हजार असान क्षमतेचे हे मैदान कुस्ती शौकीनांसाठी पर्वणी ठरणार आहे. पालकमंत्री गिरीष बापट आणि शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रविवारी दुपारी दोनला उद्घाटन होणार आहे. स्पर्धेत लहान मोठ्या अशा १३० कुस्त्या होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्पर्धा होणार आहे. अर्धा तास कुस्तीसाठी वेळ दिला जाणार आहे. कुस्ती निकाली नाही झाली तर, त्यासाठी ३ मिनिटांचे दोन राऊंड देऊन ज्याला अधिक गुण मिळतील, त्याला विजेता घोषित केले जाणार आहे.