जलपर्णीने व्यापले इंद्रायणीचे पात्र, महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 01:57 AM2019-02-03T01:57:12+5:302019-02-03T01:57:23+5:30
इंद्रायणी नदीची अवघी गटारगंगा झाली आहे. पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. नदीचे अवघे पात्र जलपर्णीने व्यापले आहे.
मोशी - इंद्रायणीनदीची अवघी गटारगंगा झाली आहे. पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. नदीचे अवघे पात्र जलपर्णीने व्यापले आहे. मोशी, केळगाव, डुडुळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई आदी भागातील नदीपात्र तर जलपर्णीचे मैदान झाले आहे. जलपर्णीमुळे जलचरदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाणी काळे पडले असून, जनावरांनादेखील पिण्यायोग्य राहिलेले नाही. शेतीला पाणी देत असताना पाण्याला फेस येत असून पिकेदेखील घटली आहेत. पाण्यामुळे अंगाला खाज येत असून, त्वचाविकार उद्भवत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी प्रक्रिया न होताच नदीत मिसळत आहे. कुदळवाडी परिसरातून रासायनिक पाणी नदीत मिसळत आहे. यामुळे नदी अधिक प्रदूषित झाली असून, जलपर्णी वाढीला खतपाणी मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणी सुधार योजनेचा, जलपर्णी मुक्तीचा ऊहापोह केला जात असताना प्रत्यक्षात मात्र स्थिती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून ज्या पटीने जलपर्णी काढली जात आहे. तितक्या अधिक वेगात जलपर्णी वाढ होत आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडताना दिसून आहे.
एकंदरितच इंद्रायणीला लागलेले जलपर्णीचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. इंद्रायणीची होऊ लागलेली गटारगंगा थांबायला हवी, अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी, काठावरील गावांतील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
महापालिका प्रशासन उदासीन
जलपर्णीमुळे दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. जलपर्णी होऊ नये म्हणून ठोस उपायांची गरज आहे. मात्र त्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. ठोस उपाय योजून जलपर्णीला आळा घालण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दर वर्षी होतो मोठा खर्च
जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून दर वर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. संबंधित ठेकेदार जलपर्णी काढतो. मात्र त्यानंतर लागलीच काही दिवसांतच जलपर्णी होते. त्यामुळे महापालिकेने केलेला खर्च वाया जातो. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
जलचरांचे अस्तित्व संपुष्टात
इंद्रायणी नदीतील पाण्याचे प्रदूषण वाढल्याने नदीतील जलचरांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. जलपर्णीमुळे पाण्यात आॅक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. त्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. तसेच पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने जलचर जगू शकत नाहीत. या सर्व बाबींचा पाण्याच्या शुद्धतेवर परिणाम होतो. पाणी प्रदूषित होते.
रसायनमिश्रित, सांडपाणी थेट नदीपात्रात
1तीर्थक्षेत्र देहू, आळंदी येथून इंद्रायणी नदी वाहते. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देणारे भाविक इंद्रायणी नदीत स्नान करतात. इंद्रायणी नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने या भाविकांना त्वचाविकार होण्याची शक्यता आहे. प्रदूषित पाण्यामुळे भाविकांची कुचंबणा होते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आणि एमआयडीसीतील सांडपाणी, तसेच रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळते. त्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होते. या प्रकारांना थांबविणे आवश्यक आहे. सांडपाणी थेट नदीत मिसळू नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र महापालिका प्रशासन याबाबत उदासीन आहे.
शेती-पिकांना धोका
2आॅक्सिजन नसलेले प्रदूषित पाणी शेतजमिनीला दिल्याने त्याचा पोत खराब होतो. पिकांचेही नुकसान होते. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानास सामोरे जावे लागत आहे. इंद्रायणी नदीतील पाणी पिण्यास योग्य राहिलेले नाही. त्यामुळे शेतातील पिकांना ते कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. शेतकरी आणि नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ हे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाहीत. परिणामी त्यामुळे त्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाई तिव्रतेने जाणवणार आहे. त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.