शेलारवाडीत इंद्रायणीमाई उत्सव
By admin | Published: November 17, 2016 02:58 AM2016-11-17T02:58:48+5:302016-11-17T02:58:48+5:30
शेलारवाडीत इंद्रायणी नदीतीरावर इंद्रायणीमाईचा उत्सव व शंकराच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
देहूरोड : शेलारवाडीत इंद्रायणी नदीतीरावर इंद्रायणीमाईचा उत्सव व शंकराच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्त्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते. म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात, असे सांगितले जात असल्याने या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानांतील दीपस्तंभ पेटवितात. या दीपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.
तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते. त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले, की देवांच्या वाटेला जाऊ नका. त्यांना त्रास देऊ नका. पण, शेवटी असुर ते असुरच. म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्री शंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली.
अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली. त्यानुसार शेलारवाडी येथील इंद्रायणी नदी व शिवमंदिर ११५१ दिव्यांनी उजळविण्यात आले. त्याचबरोबर इंद्रायणी नदीची ओटी भरण्यात आली. या वेळी मावळ भाज युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, अमरदेवी पतसंस्थेचे उपाध्यक्ष हिरामण भेगडे, मावळ राष्ट्रवादीचे प्रसिद्धिप्र्रमुख सतीश भेगडे, किरण भेगडे, कामगार नेते नीलेश भेगडे,गोपाळ कांबळे,आशुतोष शेलार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अमरदेवी देवस्थानाचे वसंत जोशी, विशाल जोशी आणि मित्र परिवाराने आयोजन केले. (वार्ताहर)