उद्योगनगरीतील पोलीसही सोशल मीडियावर होणार अॅक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 08:14 PM2020-12-29T20:14:35+5:302020-12-30T18:00:17+5:30
आयुक्तालयाचे फेसबुक पेज आदी कार्यान्वित करण्यात येणार
पिंपरी : मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज स्मार्ट पद्धतीने करण्यावर आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा भर आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आयुक्तालयाचे फेसबुक पेज आदी कार्यान्वित करण्यात येईल. तसेच ट्विटर हॅंडल अधिक प्रभावीपणे ऑपरेट करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रतिसाद मिळण्यास मदत होईल, असा विश्वास कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.
हिंजवडी -माण तसेच तळवडे आयटी पार्कमुळे पिंपरी-चिंचवड शहर अधिक स्मार्ट होण्यास मोठी मदत झाली आहे. स्मार्ट फोनचा वापरकर्ते मोठ्या संख्यने आहेत. त्यांच्याकडून तक्रारी तसेच समस्या ऑनलाईन मांडल्या जातात. तसेच ऑलाईन संवादावर त्यांचा भर असतो. शहरातील नागरिकांचा स्मार्टनेस आयुक्तांना भावला असून, त्याच तुलनेत पोलिसांनाही स्मार्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आयुक्तालयाची सध्या वेबसाईट तसेच ट्विटर हॅंडल तयार करण्यात आले आहे. मनुष्यबळाअभावी ट्विटर हॅंडल प्रभावीपणे ऑपरेट होत नाही. त्यासाठी उपाययोजना करून त्यातील कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून ते अधिक प्रभावीपणे ऑपरेट करण्यात येईल. तसेच फेसबुकवर आयुक्तालयाचे पेज तयार केले जाईल. या माध्यमातून नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया नाेंदवतील, तसेच त्यांच्या अनुभवाबाबत व्यक्त होतील. यातून काही चांगल्या बाजूही त्यांना माडता येतील, असे आयुक्तांनी सांगितले.
शांतता समितीची होणार पुनर्रचना...
पोलीस आयुक्तालयांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर शांतता समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांची पुनर्रचना होणार आहे. यात डाॅक्टर, वकील, उद्योजक, शिक्षक तसेच धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह इतर घटकांच्या सदस्यांचाही यात समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देण्यात येईल. त्यामुळे समाजाशी ही समिती जोडली जाऊन पोलीस आणि नागरिक यांच्यात संवाद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.