तपास यंत्रणांच्या रडारवर उद्योगनगरी; दहशतवादी, हिंसक कारवायांतील आरोपींचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 05:35 AM2018-06-04T05:35:38+5:302018-06-04T05:35:38+5:30

बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी अमोल अरविंद काळे हा चिंचवड माणिक कॉलनीतील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले.

Industry experts on the radar of investigating agencies; Investigating the accused in terrorist, violent activities | तपास यंत्रणांच्या रडारवर उद्योगनगरी; दहशतवादी, हिंसक कारवायांतील आरोपींचा शोध

तपास यंत्रणांच्या रडारवर उद्योगनगरी; दहशतवादी, हिंसक कारवायांतील आरोपींचा शोध

googlenewsNext

पिंपरी : बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी अमोल अरविंद काळे हा चिंचवड माणिक कॉलनीतील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. देशाच्या विविध भागात दहशतवादी आणि हिंसक घटना घडल्या. त्यातील काही घटनांमध्ये, तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी आरोपींनी या शहरात आश्रय घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस आणि तपास यंत्रणा सजग झाल्या असून, या यंत्रणांनी पिंपरी-चिंचवड शहराकडे लक्ष वेधले आहे.
सप्टेंबर २०१७मध्ये बंगळुरू येथे पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर पोलीस चिंचवड येथील संशयितांपर्यंत पोहोचले. यापूर्वी नाशिक, मालेगाव येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेप्रकरणी चिंचवड, बिजलीनगर येथील समीर कुलकर्णी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते. जामिनावर सुटका झालेला समीर कुलकर्णी चिंचवडच्या बिजलीनगरचा रहिवासी आहे. या घटनांमुळे अशा हिंसक कारवायांची पाळेमुळे पिंपरी-चिंचवडपर्यंत पोहोचली असल्याचे अधोरेखित झाले आहे. पाकिस्तानच्या ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेले काही तरुण पिंपरीतील काळेवाडी परिसरात राहत असल्याचे निदर्शनास आले होते. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील आरोपींशी संबंधित काहींनी कासारवाडी, चिखली, कुदळवाडीत काही काळ वास्तव्य केल्याचे निदर्शनास आले होते. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हिंसक घटना घडल्या. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्यांनी या शहरात आश्रय घेतल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी या शहराकडे लक्ष वेधले असून, संशयितांच्या प्रत्येक हालचालीवर यंत्रणेचे लक्ष राहणार आहे. त्या दृष्टीने या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
घर भाड्याने देणाºया घरमालकांनी भाडेकरूंची पोलिसांकडे नोंद करणे बंधनकारक आहे. नोकराची नेमणूक केल्यास त्याचीही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. ही माहिती न देणाºयांवर कडक कारवाई करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. चिंचवड हद्दीत १४ जणांवर गुन्हा दाखल असून, तिघांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे, अशी माहिती परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व सहायक आयुक्त सतीश पाटील यांनी दिली.

गुन्हेगारीचे परप्रांतीय कनेक्शन
गावठी कट्टे, पिस्तूल विक्री असो की, पेट्रोल पंप घोटाळ्यासाठी वापरात येणाºया इलेक्ट्रॉनिक्स चिप असोत, अशा अवैध कामांत सक्रिय असणारे गुन्हेगार पिंपरी-चिंचवडमध्ये आश्रय घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे, तर पुण्यातील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी काही दिवस कासारवाडी आणि कुदळवाडी परिसरात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले होते. उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरात पेट्रोल पंपचालकांशी संगनमत करून इलेक्ट्रॉनिक्स चिपच्या माध्यमातून ग्राहकांना कमी पेट्रोल देऊन त्यातून नफा कमाविण्याचे उद्योग करणारे रॅकेट कार्यरत होते. इलेक्ट्रॉनिक्स चिप आणि रिमोटची तांत्रिक माहिती असलेला, रॅकेटमधील आरोपी आकुर्डीत पोलिसांच्या हाती लागला. शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचली आहे.

भाडेकरुंची नोंद करण्याकडे दुर्लक्ष
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना वारंवार भाडेकरूंची नोंद करा असे आवाहन पोलिसांकडून केले जाते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद मिळत नाही. दहशतवादी घटनांमध्ये, तसेच नक्षलवाद्यांच्या संपर्कात असलेल्यांचे वास्तव्य पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याचे अनेकदा तपासात उघड झालेले आहे. त्यामुळे यापुढील काळात भाडेकरू नोंद न करणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील केवळ २० टक्केच भाडेकरूंची पोलिसांकडे नोंद आहे. भाडेकरू, नोकरांची माहिती न देणाºयांवर कारवाईची कायद्यात तरतूद आहे. कायद्यान्वये या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात येतात, त्यामध्ये एक हजार रोख किंवा सहा महिने कैद, दोन्ही अशा शिक्षेची तरतूद असल्याचे उपायुक्त शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Industry experts on the radar of investigating agencies; Investigating the accused in terrorist, violent activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.