Pimpri Chinchwad: घरातच थाटला गॅसचोरीचा उद्योग! घरगुती वापराचा गॅस लहान सिलिंडरमध्ये भरून विकायचे
By नारायण बडगुजर | Published: September 21, 2023 06:42 PM2023-09-21T18:42:45+5:302023-09-21T18:43:19+5:30
याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली...
पिंपरी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये धोकादायकपणे गॅस काढून चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. श्रीराम कॉलनी, आहेरवाडी, चिखली येथे बुधवारी (दि.२०) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ऋतुराज अरुण पाटील (२१, रा. श्रीराम कॉलनी, आहेरवाडी, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अंमलदार चंद्रशेखर चोरघे यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज याने घरगुती वापराच्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरच्या टाक्यांमध्ये गॅस धोकादायकपणे काढून त्याची चोरी केली. त्याच्या या कृत्यामुळे स्फोट होऊन जीवितहानी होऊ शकते याची जाणीव असतानाही त्याने असे कृत्य केले. गॅस चोरून भरलेल्या टाक्या त्याने काळ्याबाजारात विकून शासनाची व ग्राहकांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
आहेरवाडी येथे अशाप्रकारे गॅसची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चिखली पोलिसांनी बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ऋतुराज याच्या घरी धाड मारून कारवाई केली. यात पोलिसांनी दोन लाख १० हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.