उद्योगनगरीची ओळख उड्डाणपुलांचे शहर

By admin | Published: May 30, 2017 02:53 AM2017-05-30T02:53:22+5:302017-05-30T02:53:22+5:30

आशिया खंडात आॅटो हब, कामगारनगरी म्हणून परिचित असणारे पिंपरी-चिंचवड शहर हे आता उड्डाणपुलांचे शहर होत आहे

Industry recognized the city of flyovers | उद्योगनगरीची ओळख उड्डाणपुलांचे शहर

उद्योगनगरीची ओळख उड्डाणपुलांचे शहर

Next

विश्वास मोरे/लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आशिया खंडात आॅटो हब, कामगारनगरी म्हणून परिचित असणारे पिंपरी-चिंचवड शहर हे आता उड्डाणपुलांचे शहर होत आहे. शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक, बंगळूर-पुणे-मुंबई या प्रमुख सर्वच रस्त्यांवर नवीन उड्डाणपूल उभारले आहेत. त्यामुळे आता उड्डाणपुलाचे शहर अशी ओळख मिळू लागली आहे.
अत्यंत वेगाने विकसित झालेले शहर हे पिंपरी-चिंचवड आहे. गेल्या तीस वर्षांत या शहराचा विकास झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण अशा दोन संस्थांनी मिळून एकत्रितपणे शहराचा विकास केला आहे. शहरातील वाहतूककोंडी सुरळीत व्हावी, या उद्देशाने उड्डाणपूल उभारले आहेत. शहरातील पहिला उड्डाणपूल पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ उभारण्यात आला. स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाणपूल असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावरील निगडीतील टिळक चौकातील पूल, वाकड येथील हिंजवडीकडे जाणारा पूल उभारण्यात आला. पुण्याबरोबरच शहराचा जेएनएनयूआरमध्ये समावेश झाल्याने मोठ्याप्रमाणावरविकासकामे झाली. त्यापाठोपाठ भोसरीतील सर्वांत लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला. त्यानंतर कासारवाडी फाट्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला दुमजली पूल उभारण्यात आला. प्राधिकरणाने चिखली कुदळवाडी, टाटा मोटर्स, थेरगाव डांगे चौक, केएसबी चौक, चिंचवडगाव अशा ठिकाणी उड्डाणपूल उभारले.
नियोजनाअभावी पूल फसले
नियोजनाअभावी शहरातील पुलांचे काम रखडले आहे. भूसंपादन नसतानाच पुलाची घाई केल्याने पुणे-मुंबई महामार्गावरील एम्पायर इस्टेट पुलाचे काम रखडले आहे. मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. तसेच चिंचवड गावातील पुलाचा गोलाकार आराखडा बदलण्यात आला. तसेच वाकड गावातील पुलाचे नियोजन फसल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
औंध-रावेत मार्गावर नवी सांगवीकडे जाणाऱ्या चौकात उड्डाणपूल उभारला आहे. या पुलाचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले आहेत. पुलाचे उद्घाटन होणार कधी? याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त प्रकाशित केले होते. तसेच विविध राजकीय पक्षांनीही याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर पालिका प्रशासनास जाग आली आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती प्रस्तावित उड्डाणपूल

१रावेत-औंध मार्गावर जगताप डेअरी चौक, वाल्हेकरवाडी, ताथवडे-थेरगाव, प्राधिकरण-रावेत, निगडीतील भक्ती शक्ती चौक येथे पूल प्रस्तावित आहेत. त्यापैकी १०० कोटींच्या निगडीतील पुलास मान्यता मिळाली आहे. उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी भक्ती-शक्ती चौकातील विविध सेवावाहिन्या व उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे स्थलांतर केले जाणार आहे. त्यामुळे या कामासाठी एकूण ९० कोटी ५३ लाखांच्या खर्चाला मंजुरीसाठी प्रशासनाने स्थायीसमोर प्रस्ताव ठेवला होता. भक्ती-शक्ती चौकात नियोजित उड्डाणपूल हा रोटरी ब्रिज असणार आहे.
२त्यावर पादचाऱ्यांना चौकाच्या कोणत्याही दिशेने ये-जा करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. उड्डाणपुलावरून जाणाऱ्या प्रवाशांना भक्ती-शक्ती शिल्पसमूहाचे दर्शन होणार आहे. स्पाइन रस्त्याला समांतर ग्रेड सेपरेटर उभारण्यात येईल. त्यामध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग असणार आहेत. निगडी-प्राधिकरण ते मोशी हा भाग ग्रेड सेपरेटरमुळे जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक महामार्गावरून देहूरोड, तसेच बावधन, कात्रज, सातारा या भागाकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी ग्रेड सेपरेटरमधून जाण्याची व्यवस्था असणार आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील मोरवाडीजवळ एम्पायर इस्टेट हा पूल सुमारे १८०० मीटर लांबीचा असून, या पुलासाठी १०० कोटी रुपये खर्च आला आहे. आॅटो क्लस्टर, चिंचवडपासून पूल सुरू होऊन महामार्गवरून एम्पायर इस्टेट लोहमार्ग, पवना नदी ओलांडून काळेवाडीत उतरणार आहे. हा पूल जुलैपर्यंत खुला होईल.

महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर उड्डाणपूल उभारले आहेत. वाहतूकप्रश्न आणि दळणवळण सुलभ व्हावे या दृष्टीने पूल उभारण्यात आले आहेत. उद्यानांचे शहर अशी ओळख आता पुलांचे शहर अशी होईल.
- राजन पाटील, सह शहर अभियंता

Web Title: Industry recognized the city of flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.