हलगर्जीपणामुळे चिमुकल्‍याचा मृत्यू; डाॅक्‍टर, परिचारिकांवर गुन्‍हा दाखल

By नारायण बडगुजर | Published: November 5, 2024 08:27 PM2024-11-05T20:27:13+5:302024-11-05T20:27:31+5:30

ससून रुग्‍णालयातील समितीच्‍या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. त्यानंतर तीन डॉक्‍टरांसह दोन परिचारिकांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला.

Infant death due to negligence; Crime filed against doctors, nurses | हलगर्जीपणामुळे चिमुकल्‍याचा मृत्यू; डाॅक्‍टर, परिचारिकांवर गुन्‍हा दाखल

हलगर्जीपणामुळे चिमुकल्‍याचा मृत्यू; डाॅक्‍टर, परिचारिकांवर गुन्‍हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन वर्षीय मुलाजवळ वॉर्मर मशीन ठेवले. यात चिमुरड्याचा गुडघ्‍याखालील पाय जळाला. या घटनेत त्याचा मृत्‍यू झाला. चिखली येथील इम्‍पिरीअल रुग्‍णालयात १८ नोव्‍हेंबर २०२३ रोजी ही घटना घडली. ससून रुग्‍णालयातील समितीच्‍या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. त्यानंतर तीन डॉक्‍टरांसह दोन परिचारिकांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला.

दिरांश रमाकांत गादेवार (वय २) असे मृत्‍यू झालेल्‍या मुलाचे नाव आहे. याबाबत त्‍याची आई दीपाली गादेवार (३६, रा. नेवाळेवस्‍ती, चिखली) यांनी मंगळवारी (दि. ५) चिखली पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. डॉ. जितेश मदनसिंग दाेभाळ, डॉ. रजनिश जगदंबाप्रसाद मिश्रा, डॉ. रोहन प्राणहंस माळी, परिचारिका रेचल अनिल दिवे, सविता नंदकिशोर वरवटे यांच्‍या विरोधात पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला.

फिर्यादी दीपाली यांचा मुलगा दिरांश याला सर्दी झाल्‍याने त्‍याला डॉ. दोभाळ यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार नेवाळेवस्‍ती, चिखली येथील इम्‍पिरीअल रुग्‍णालयात दाखल केले. त्‍याच्‍यावर उपचार सुरू असताना १८ नोव्‍हेंबर २०२३ रोजी सकाळी सातच्‍या सुमारास डॉ. मिश्रा, डॉ. रोहन हे बाळाचे सॅम्‍पल घेण्‍यासाठी आले. त्‍यांनी दिरांश याच्‍या आईला बाहेर थांबण्‍यास सांगितले. त्‍यानंतर सकाळी आठ वाजताच्‍या सुमारास दीपाली या पुन्‍हा मुलाजवळ आल्‍यानंतर त्‍यांना धक्‍काच बसला. बाळाच्‍या पायाजवळ ठेवलेल्‍या वार्मर मशीनमुळे बाळाचा गुडघ्‍याखाली पाय पूर्णपणे जळाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेत दिरांश याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल

याबाबत दीपाली यांनी तक्रार दिली. यामुळे बाळाच्‍या उपचाराची कागदपत्र ससून येथील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या समितीकडे पाठविली. या समितीचा अहवाल प्राप्‍त झाला. या अहवालात रुग्णालयातील संबंधित डॉक्‍टर व कर्मचारी यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्‍याचे नमूद आहे. त्‍यानुसार चिखली पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

Web Title: Infant death due to negligence; Crime filed against doctors, nurses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.