इंधन वाढीने महागाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:50 AM2018-10-14T01:50:08+5:302018-10-14T01:50:25+5:30

- प्रकाश गायकर पिंपरी : इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यानच्या ...

Inflation due to fuel hike | इंधन वाढीने महागाईच्या झळा

इंधन वाढीने महागाईच्या झळा

Next

- प्रकाश गायकर

पिंपरी : इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यानच्या काळात केंद्र व राज्य सरकारने इंधनाचे दर काही प्रमाणात कमी केले. परंतु, पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे.


सद्य:स्थितीला शहरामध्ये पेट्रोलचे भाव ८७.९५ रुपये प्रतिलिटर आहेत तर डिझेलने ७७.४२ रुपये प्रतिलिटरचा दर गाठला आहे. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत. मात्र त्याचा परिणाम राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.


सरकारने दरम्यानच्या काळामध्ये व्हॅट कमी केल्यामुळे इंधनाचे दर काही प्रमाणात कमी झाले. तरी बहुतांश ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर हे दर चढेच दिसत होते. त्यानंतरही सातत्याने दर वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील उद्योगावरही परिणाम झाला आहे. कच्चा माल कंपन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जास्त भांडवल लागत आहे. त्यामुळे छोटे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत.


इंधनावर अवलंबून असलेल्या जीवनावश्यक वस्तू महागल्याने सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. अनेक नागरिक पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्यामध्ये कामानिमित्त ये-जा करत असतात. रोजच्या इंधन दरवाढीमुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

भाजीपाला कडाडला
इंधनाच्या वाढत्या दरामुळे शेतीमाल बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी खर्च वाढला आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रान्सस्पोर्ट कंपन्या बाजारपेठेमध्ये शेतीमाल पोहोचविण्यासाठी जादा पैसे आकारत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. वाटाण्याचे भाव १४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गवार ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना इंधनाचे दरदेखील रोज वाढत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अच्छे दिनची खुमासदार चर्चा
अच्छे दिनची स्वप्ने दाखवत केंद्र सरकारने निवडणुकीमध्ये मते पदरात पाडून घेतली. मात्र इंधनाच्या दरवाढीवर नियंत्रण न ठेवून देशातील सामान्यांचे कंबरडे मोडले. याासाठीच का अच्छे दिनचे गाजर आम्हाला दाखवले, अशा खुमासदार चर्चा सोशल मीडियामधून रंगत आहेत.

फळे खाताहेत भाव
पिंपरी मंडईमध्ये अनेक ठिकाणाहून फळांची आवक होते. किवी, सफरचंद, ड्रॅगन फ्रूट ही फळे बाहेरील राज्यातून मुंबईमध्ये येतात व त्यानंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये त्यांची आवक होते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी फळांच्या किमतीही वाढल्या आहेत. सफरचंद १२०, डाळिंब १२० तर संत्री १५० रुपये किलो दराने विकली जात आहे.

सिलिंडरचाही भडका
४एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असताना घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या ८७१ रुपयाला गॅस सिलिंडर मिळत आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये हेच सिलिंडर ७४२ रुपयाला मिळत होता. महिन्याभरात सिलिंडरमध्ये ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

 

नोकरीनिमित्त मी रोजच पुण्यामध्ये जात असतो. मात्र पेट्रोलचे दर दिवसेंदिवस इतके वाढत आहेत की त्यामुळे जाण्या-येण्यामध्येच बरेचसे पैसे खर्च होतात. मध्यंतरी सरकारने भाव कमी केल्याचा दिखावा केला. त्यानंतरही दररोजच वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस वैतागला आहे.
- संतोष शिंदे, नागरिक


शेतकऱ्याकडून अथवा व्यापाºयाकडून शेतीमाल कमी किमतीमध्ये मिळाला तरी बाजारापर्यंत आणण्यासाठी वाहनखर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहनखर्चामध्ये वाढ झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर वाढवावे लागतात.
- विष्णू शिंदे, भाजी विक्रेते

इंधन दरवाढीचा परिणाम फळांच्या भाववाढीवर झाला आहे. पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच आहेत. त्यामुळे फळे बाजारापर्यंत आणण्यासाठीचा खर्च वाढला आहे. परिणामी फळांचे भाव वाढले आहेत.
- कुमार शिरसाठ फळ विक्रेते

Web Title: Inflation due to fuel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.