मॉडेल वॉर्ड कामांची चौकशी करा
By admin | Published: April 26, 2017 03:46 AM2017-04-26T03:46:44+5:302017-04-26T03:46:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात ज्या ज्या भागात मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबविण्यात आली, त्या मॉडेल वॉर्डातील कामांची चौकशी करण्याचे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात ज्या ज्या भागात मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबविण्यात आली, त्या मॉडेल वॉर्डातील कामांची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी मंगळवारी (दि. २५) प्रशासनाला दिले. तोपर्यंत ही कामे केलेल्या ठेकेदारांची बिले थांबविण्यास त्यांनी सांगितले. महापालिकेला आर्थिक शिस्त लागलीच पाहिजे. त्यामुळे ठेकेदारांना द्यावयाच्या बिलांबाबत राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. ठेकेदारांची २०१६-१७ या वर्षांतील बिले २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद रकमेतूनच देण्यात यावेत, असा अंतिम निर्णय सभेत घेण्यात आल्याचे सावळे यांनी सांगितले.
स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेने शहरात ठराविक भागात मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबविली. अशा मॉडेल वॉर्डमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. मात्र, खरोखरच मॉडेल वॉर्ड झाले आहेत का? याबाबत शंका उपस्थित करावी, अशी परिस्थिती आहे. मॉडेल वॉर्डमध्ये राबविलेल्या कामांमध्ये अनागोंदी कारभार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने ज्या ज्या भागात मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबवून विकासकामे केली, त्याची चौकशी करण्याची गरज असल्याचे सीमा सावळे यांनी सभेत सांगितले. त्यानुसार मॉडेल वॉर्डमध्ये राबविण्यात आलेल्या विकासकामांची चौकशी करण्याचे आदेश दिले.(प्रतिनिधी)