नोंदणीनंतर संस्थांचा असहकार
By Admin | Published: May 10, 2017 04:01 AM2017-05-10T04:01:19+5:302017-05-10T04:01:19+5:30
उपनिबंधक कार्यालयात सहकारी संस्थेची नोंद केली जाते. मात्र, काही सहकारी संस्था पत्त्याच्या ठिकाणावरच आढळत नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : उपनिबंधक कार्यालयात सहकारी संस्थेची नोंद केली जाते. मात्र, काही सहकारी संस्था पत्त्याच्या ठिकाणावरच आढळत नाहीत. अशा सहकारी संस्थांचे कामकाज होते की नाही याबाबत खात्री नसते. यामुळे अशा संस्था केवळ नोंदणीपुरत्याच नावारूपाला येतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही लोक एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन केली जाते. त्यावर उपनिबंधकांचे नियंत्रण असते. संस्थांचे कामकाज सुरु राहण्यासह त्यांच्या वेळोवेळी मीटिंग, कागदपत्रांचे अपडेट असणे आवश्यक असते. मात्र, अनेक संस्थांचे कामकाजच बंद असल्याचे आढळून येत आहे. शिवाय त्यांचे कार्यालयदेखील सापडत नाहीत अशी स्थिती आहे. पिंपरीतील उपनिबंधक कार्यालयाकडून अशा संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कामकाज बंद असणाऱ्या आणि पत्ता न सापडणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरीतील उपनिबंधक कार्यालयाकडून २२५४ पैकी २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९५ सहकारी संस्थांची, तर या आर्थिक वर्षात आणखी ४० संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द केलेल्या सहकारी संस्थांंमध्ये औद्योगिक, स्वयंरोजगार, ग्राहक, सेवक पतसंस्थांचा समावेश आहे.
दोन वर्षांपूर्वी शहरातील सर्व संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये पत्ता न सापडणाऱ्या संस्थांचा शोध घेण्यात आला होता. दप्तरी नोंद असणाऱ्या पत्त्यांवर त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. तसेच खात्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन शोधही घेतला. मात्र, त्या ठिकाणी संस्था आढळून आल्या नाहीत. अखेर त्या संस्थांची नोंदणी रद्द केली.