महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 02:08 AM2018-12-07T02:08:09+5:302018-12-07T02:08:12+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उन्नती प्रकल्प राबविणे, विद्यार्थ्यांना आरोग्य विमा योजना राबविणे, असे विषय शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उन्नती प्रकल्प राबविणे, विद्यार्थ्यांना आरोग्य विमा योजना राबविणे, असे विषय शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येणार आहे. महापालिकेत नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण समितीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोनाली गव्हाणे होत्या. महापालिका शाळांतील शिक्षण अध्ययन स्तर निश्चित करण्यात आला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार केला.
सोनाली गव्हाणे म्हणाल्या, ‘‘महापालिकास्तरीय शिक्षण परिषद झाली. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते असा सर्वसाधारण समज दूर करत अध्ययन स्तर निश्चित करण्यात आला. यानुसार पहिली ते आठवीच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार लेखन, वाचन आदींची माहिती असावी यानुसार काही निकष ठरवण्यात आले. या निकषांच्या आधारे प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांची प्रगती निश्चित करण्यात आली. विद्यार्थी अप्रगत असतील तर मात्र अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीस देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी गुणवत्ता तपासणी पथक तयार केले जाणार आहे. यात सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश राहणार आहे.’’
तसेच समितीच्या बैेठकीतील विषय पत्रिकेवर विषय नव्हते. ऐनवेळी विषय मंजूर करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा काढणे, चºहोलीतील पंडित जवाहरलाल नेहरू शाळा, वडमुखवाडी शाळा, रावेत, पुनावळे, ताथवडे येथील शाळांसाठी बससुविधा उपलब्ध करून देणे़ आदी विषयांचा समावेश होता़