मुळशीतील इच्छुक उमेदवार पुन्हा ॲक्टिव्ह; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:34 IST2025-01-16T09:34:32+5:302025-01-16T09:34:43+5:30

महापालिकासह, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने, अनेक विद्यमान उमेदवारांसह नवीन इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला

Interested candidates in Mulshi are active again; Local body elections are gaining momentum | मुळशीतील इच्छुक उमेदवार पुन्हा ॲक्टिव्ह; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग

मुळशीतील इच्छुक उमेदवार पुन्हा ॲक्टिव्ह; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग

हिंजवडी : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षेपेक्षा जास्त लांबल्याने, आयटीनगरीसह मुळशी तालुक्यातील संभाव्य इच्छुक उमेदवार डीॲक्टिव्ह मोडमध्ये गेले होते. अनेकांनी कार्यकर्त्यांशी संपर्क कमी करून, आपली संपर्क कार्यालयेसुद्धा बंद केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्याने, इच्छुक उमेदवार पुन्हा ॲक्टिव्ह झाले आहे.

अनेकांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत चमकोगिरी सुरू केली आहे. दरम्यान, महापालिकासह, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने, अनेक विद्यमान उमेदवारांसह नवीन इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला होता. हक्काच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करत अनेकांनी जनसंपर्क कार्यालये सज्ज केली होती. आपापल्या प्रभागात विविध स्पर्धा, सभारंभ, मेळावे, शिबिरे यांच्या आयोजनांचा धडाका लावला होता.

ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांसह, सहली आयोजित केल्या जात होत्या. मात्र, सातत्याने विविध कारणास्तव निवडणुका पुढे ढकलत गेल्याने, भ्रमनिरास होऊन इच्छुक अक्षरशः डीॲक्टिव्ह मोडमध्ये गेले होते. परंतु, काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याचे सुतोवाच मिळत असल्याने, आजी - माजीसह सर्व इच्छुक उमेदवार पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाल्याचे चित्र आयटीनगरीसह मुळशी तालुक्यात पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर

येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत. हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी इच्छुक उमेदवार सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना दिसत आहेत. टार्गेट झेडपी २०२५, भावी सभापती, आता माघार नाही, मैदान आपलेच, तालुक्यातील उभरतं नेतृत्व, लक्ष २०२५ अशा आशयाच्या पोस्ट आणि रिल्स सोशल मीडियावर फिरत आहेत.

Web Title: Interested candidates in Mulshi are active again; Local body elections are gaining momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.