‘व्हाईटकॉलर’साठी इच्छुक
By Admin | Published: February 3, 2017 04:19 AM2017-02-03T04:19:28+5:302017-02-03T04:19:28+5:30
राजकीय पुढारी, नगरसेवकांसाठी ‘मसल’ पॉवर उपलब्ध करून देणाऱ्या गुंडांच्या अपेक्षा वाढल्या असून, महापालिका निवडणुकीत उतरण्याची अनेकांनी तयारी केली आहे
पिंपरी : राजकीय पुढारी, नगरसेवकांसाठी ‘मसल’ पॉवर उपलब्ध करून देणाऱ्या गुंडांच्या अपेक्षा वाढल्या असून, महापालिका निवडणुकीत उतरण्याची अनेकांनी तयारी केली आहे. ‘व्हाईटकॉलर’ होण्यासाठी ते विविध राजकीय पक्षांच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष एकमेकांवर ‘गुंडांचा पक्ष’ असा आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत.
महापालिकेत यापूर्वी निवडून आलेल्या आजी-माजी नगरसेवकांपैकी काहींची छायाचित्र अद्यापही विविध पोलीस ठाण्यात गुन्हेगारांच्या यादीत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेख दिसून येतो. राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असल्याने अशाच व्यक्तींना प्राधान्यक्रम दिला जात आहे. गुन्हेगारांना राजाश्रयाची गरज भासते. राजकारणी मंडळी त्यांचा खुबीने वापर करून घेतात.
गुंडांना ‘व्हाईटकॉलर’ म्हणून वावरण्याची संधी देण्यामध्ये राजकीय पक्षांचा पुढाकार आहे. नागरिकांनी नाराजी, संताप व्यकत केला तरी त्याची पर्वा न करता, राजकीय पक्ष अशा उमेदवारांना उमेदवारी देतात. राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार होण्याऐवजी शिरकाव करण्यास वातावरण तयार करून दिले जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे नगरसेवक यापूर्वी निवडून आले होते, त्यांचे गुन्हेगारी कारनामे नागरिकांना पाहायला मिळाले आहेत. नागरिकांच्या भावनेची कदर न करता, नगरसेवकांची संख्या कशी वाढवता येईल, या भूमिकेतून राजकीय पक्षांचे पदाधिकारी काम करीत असल्याने इच्छुकांमध्ये गुंडांची संख्या वाढली आहे. गुन्हेगारांना व्हाईटकॉलर म्हणून वावरण्यापासून रोखण्याचे काम राजकीय पक्षांकडूनच होऊ शकते. अशा व्यकतींना उमेदवारी नाकरून चांगल्या व्यक्तींना संधी दिली, तरच हे शक्य आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
गुन्हेगारांच्या नादाला कोण लागणार ?
वर्षानुवर्षे राजकारण्यांबरोबर राहून त्यांची कामे करत असताना, आता गुंडांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून ते नगरसेवक होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सादर केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर ‘कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत’ असे नमूद करून मोकळे व्हायचे. कोणी आक्षेप घेतला तरच चौकशी होते, निवडणूक रिंगणातून बाद होण्याची शक्यता असते. परंतु, गुंडांच्या नादी कोण लागणार, अशी मानसिकता करून कोणी गुंडांच्या उमेदवारीबद्दल कोणीच आक्षेप घेत नाही? नेमका याचाच फायदा उठविण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे.