कौतुकास्पद ! मोफत उपचारांसह अन्नदान, पिंपरीतील डॉक्टरचे कार्य महान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 06:14 PM2020-03-30T18:14:22+5:302020-03-30T18:23:43+5:30
चिखली येथील एका डॉक्टरने मजूर, कामगारांना रुग्णालयात मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांच्यावर मोफत उपचार देखील सुरू केले आहेत.
पिंपरी : हातावर पोट असलेल्या मजूर, कामगारांचा निवारा व दोनवेळचे जेवण देखील कोरोनाच्या महामारीने हिरावले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होऊन मरण यायचे ते येईल. मात्र आज जगायचे कसे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. ही बाब लक्षात घेऊन चिखली येथील एका डॉक्टरने मजूर, कामगारांना रुग्णालयात मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांच्यावर मोफत उपचार देखील सुरू केले आहेत.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना मरणाच्या दाढेतून परत आणून त्यांना ठणठणीत बरे करण्याची किमया पिंपरी – चिंचवडधील डॉक्टरांनी साधली आहे. या डॉक्टर, परिचारिका आदींचे कार्य मानवतेसाठी नवा आदर्श आहे. मात्र असे ऐतिहासिक व महत्वपूर्ण कार्य करण्याची संधी प्रत्येक डॉक्टरांना मिळतेच असे नाही. असे असले तरी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी शक्य ती मदत करायची, या उद्देशाने चिखली येथील डॉ. जितेंद्रसिंग राठोड यांनी हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना जेवण उपलब्ध करून दिले. चिखली येथील साने चौकाजवळ त्यांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या परिसरात मजूर व कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे काम बंद असल्याने त्यांचे हाल होत असल्याचे डॉ. राठोड यांच्या निदर्शनास आले. पैसे नसल्याने अनेक कुटुंबांचे हाल होत होते. तसेच अनेक जण मूळगावी जाण्याच्या तयारीत होते.
मजूर व कामगारांना दिलासा देण्यासाठी डॉ. राठोड यांनी सुरुवातीला दोनशे जणांचे जेवण तयार केले. ते लगेचच संपले. त्यानंतर दररोज त्यात वाढ करण्यात येत आहे. दररोज सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत जेवण वाटप करण्यात येत आहे. सुमारे आठशे ते हजार मजूर व कामगार येथून जेवण घेऊन जात आहेत. तसेच यातील काही जणांना आजार असल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर मोफत उपचार देखील करण्यात येत आहेत. त्यासाठी डॉ. राठोड यांनी त्यांच्या रुग्णालयातील ‘ओपीडी’ दिवसभर सुरूच ठेवली आहे. याबाबत बोलताना डॉ. जितेंद्रसिंग राठोड म्हणाले की, 'कोरोना महामारीमुळे अनेक जण अडचणीत आहेत. जेवणसाठी वाताहात होत असल्याने मजुरांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून त्यांना दिलासा मिळत आहे. रुग्णालयातून मिळणारी रक्कम या मजुरांसाठी खर्च केली जात आहे. दररोज सुमारे दोन हजार जणांना जेवण देण्याची तयारी केली आहे'.
रुग्णालयातील कर्मचा-यांचेही सहकार्य
डॉ. राठोड यांनी गरिब व गरजूंसाठी दिलेला हा मदतीचा हात पाहून त्यांच्या रुग्णालयातील कर्मचा-यांनाही अप्रुप वाटले. त्यामुळे त्यांनीही यात सहभागी होत जेवण तयार करण्यापासून त्याचे पार्सल तयार करण्यापर्यंत सर्वच कामात मदत सुरू केली आहे. यासह इतर काही व्यक्ती व संघटना तसेच संस्थांकडून देखील डॉ. राठोड यांना सहकार्यासाठी विचारणा होत आहे. त्यामुळे आजारांवर विविध ‘डोस’ देणा-या डॉ. राठोड यांचा हा समाजसेवेचा ‘डोस’ देखील गुणकारी ठरला असल्याचे दिसून येत आहे.