पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील चार निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
By प्रकाश गायकर | Updated: November 24, 2023 20:34 IST2023-11-24T20:34:29+5:302023-11-24T20:34:51+5:30
एक महिन्यापूर्वी आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील चार निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि. २४) देण्यात आले. एक महिन्यापूर्वी आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
शहर पोलीस दलात २६ ऑक्टोबर रोजी आठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांना एक महिन्याचा कालावधी होण्यापूर्वीच बदलीचा दुसरा आदेश निघाला आहे. या आदेशामध्ये चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गुन्हे शाखेचे अजित लकडे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून देहूरोड येथे बदली झाली आहे. हिंजवडीचे सुनील दहिफळे यांची वाहतूक विभागात, देहूरोडचे दिगंबर सूर्यवंशी यांची विशेष शाखेत. तर पिंपरीचे अनिल देवडे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील काही पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक विभागात पोलीस निरीक्षक पदे रिक्त आहेत. भोसरी, एमआयडीसी भोसरी, देहूरोड पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) रिक्त आहेत. गुन्हे शाखा युनिट चार, युनिट पाच, दरोडा विरोधी पथक, सायबर शाखेसाठी देखील पोलीस निरीक्षक नाहीत. वाहतूक शाखेतही हीच परिस्थिती आहे. तळवडे वाहतूक विभाग, तळेगाव वाहतूक विभाग, हिंजवडी वाहतूक विभाग, बावधन वाहतूक विभागाची मदार सहायक पोलीस निरीक्षकांवर आहे.