‘व्हिसेरा’ अहवालाने रखडला गुन्ह्यांचा तपास

By admin | Published: August 30, 2015 03:01 AM2015-08-30T03:01:09+5:302015-08-30T03:01:09+5:30

मृतदेहाचे विच्छेदन करताना संशयास्पद स्थिती आढळल्यास डॉक्टर व्हिसेरा राखून ठेवून न्यायवैद्यक प्रयोगशाळा अथवा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवितात.

Investigation of crimes committed by the Vicerra report | ‘व्हिसेरा’ अहवालाने रखडला गुन्ह्यांचा तपास

‘व्हिसेरा’ अहवालाने रखडला गुन्ह्यांचा तपास

Next

- मंगेश पांडे,  पिंपरी
मृतदेहाचे विच्छेदन करताना संशयास्पद स्थिती आढळल्यास डॉक्टर व्हिसेरा राखून ठेवून न्यायवैद्यक प्रयोगशाळा अथवा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवितात. येथील अहवाल प्राप्त झाल्यानंतर शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांकडून मृत्यूच्या कारणाचा अंतिम अहवाल पोलिसांना दिला जातो. मात्र, प्रयोगशाळेकडून मुदतीत अहवाल प्राप्त होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या वर्षीच्या आठ महिन्यांत अवघे ५६ अहवाल प्राप्त झाले आहेत.
अपघाती मृत्यू, एखाद्या गुन्ह्यात झालेला मृत्यू अथवा संशयास्पद मृत्यू झाल्यास शवविच्छेदन केले जाते. या दरम्यान डॉक्टरांना काही संशयास्पद आढळ्यास ‘व्हिसेरा’ राखून ठेवला जातो. हा ‘व्हिसेरा’ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जातो. येथील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधित डॉक्टरांकडून अंतिम अहवाल तयार करून तपास अधिकाऱ्याकडे पाठविला जातो. त्यानंतर तपासाला गती येते.
अनेक प्रकरणांत न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे प्रकारही घडले आहेत. डॉक्टरांच्या अहवालावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे या अहवालालादेखील अत्यंत महत्त्व असते.
‘व्हिसेरा’ म्हणजे शवविच्छेदनादरम्यान शरीरातील काही अवयव तपासणीसाठी काढून घेतले जातात. मृत्यू ज्या अवयवाशी संबंधित आहे. तो अवयव प्रामुख्याने घेतला जातो. एका बाटलीत विशिष्ट प्रकारचे केमिकल टाकून त्यामध्ये हे अवयव ठेवले जातात. ही बाटली सीलबंद करून तपास अधिकाऱ्याकडे दिली जाते. त्यांच्यामार्फतच ‘व्हिसेरा’ न्यायवैद्यक प्रयोगशाळेत जमा केला जातो. यकृत, मूत्रपिंड, मेंदू, हृदय या अवयवांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश असतो.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पोस्टमार्टेम सेंटरमध्ये शहरासह जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यांतूनही मृतदेह विच्छेदनासाठी येत असतात. त्यामुळे दर दिवशी विच्छेदनासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या किमान दोन ते तीन इतकी असते.
जानेवारी ते आॅगस्टदरम्यान वायसीएममधील पोस्ट मार्टेम सेंटरमध्ये १ हजार ७४ शवविच्छेदन झाले. यापैकी २७२ मृतदेहांचे ‘व्हिसेरा’ राखून ठेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. याच आठ महिन्यांत केवळ ५६ तपासणी अहवाल ‘पोस्टमार्टेम सेंटर’ला प्राप्त झाले आहेत.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिलेले अहवाल महिनाभरात प्राप्त होणे अपेक्षित असते. मात्र, सहा-सहा महिने उलटूनही अहवाल प्राप्त होत नसल्याने तपास यंत्रणेत अडथळे येत आहेत.
मृताचा नातेवाईक जोरदार पाठपुरावा करीत असेल, तर तपास अधिकारीही तितक्याच तत्परतेने हालचाली करतात. पोलीस प्रयोगशाळेकडेही याबाबत पाठपुरावा करतात.
संशयास्पद मृत्यूनंतर त्याबाबत नातेवाईक डॉक्टरांकडे विचारपूस करण्यास गेले असता ‘व्हिसेरा’ राखून ठेवला असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. मात्र, याबाबतची नातेवाइकांना फारशी माहिती नसते. त्यानंतर नातेवाईक पोलिसांकडेही पाठपुरावा करतात.
शवविच्छेदन विभागातून पोलीस तपास अधिकारी ‘व्हिसेरा’ घेऊन जातात. मात्र, अनेकदा तो प्रयोगशाळेपर्यंत पोहोचतच नाही. इतर कामकाजात व्यस्त असलेले पोलीस कर्मचारी यासाठी वेळ काढतील, तेव्हा तो प्रयोगशाळेत जमा होतो. या दरम्यान ‘व्हिसेरा’ खराब होण्याचीही भीती असते.

मृतदेह विच्छेदनासाठी आल्यानंतर त्यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास ‘व्हिसेरा’ राखून ठेवला जातो. त्यानंतर तो तपासणीसाठी पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविला जातो. तेथून त्यांचा अहवाल आल्यानंतरच अंतिम अहवाल तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे दिला जातो.
- डॉ. आर. वाय. साळुंखे,
वैद्यकीय अधिकारी,
शवविच्छेदन विभाग

Web Title: Investigation of crimes committed by the Vicerra report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.