लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरु; निगडीत सर्वेक्षण पथकाकडून २९ लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 09:26 AM2024-05-03T09:26:34+5:302024-05-03T09:26:59+5:30
निवडणुक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत
पिंपरी : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर तपासणी सुरु आहे. विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत. निगडी येथे सर्वेक्षण पथकाने केली २९ लाखांची रोकड जप्त केली आहेत.
पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली २०६, निवडणुक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्याअनुषंगाने दैंनदिन अहवाल मावळ लोकसभेचे निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर केले जात आहेत. निगडी व दापोडी या ठिकाणी पथके तैनात आहेत.
कामगारदिनी बुधवार सायंकाळी पाच वाजता निगडी येथील सर्वेक्षण पथकाने वाहन क्रमांक एमएच १२, यू व्ही ५००५ या वाहनाची तपासणी केली. वाहनामध्ये असणारी रक्कम रोख २९ लाख ५० हजार आढळुन आली. चौकशी केली असता ही रक्कम दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे दिसुन आले. कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण व जप्ती पंचानामा केला आहे. जप्त रक्कम व अनुषंगिक कागदपत्रे उप आयुक्त प्राप्तीकर विभाग आणि मावळ विभाग ३३ मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यांच्याकडे सुपूर्त केली आहे.