कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई! तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 20:32 IST2022-03-23T20:23:37+5:302022-03-23T20:32:11+5:30
तक्रारी अर्जाकडे दुर्लक्ष करणे पोलिस अधिकाऱ्याला भोवले...!

कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई! तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी
पिंपरी : माथाडी कामगारांच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. तसेच उद्योजक, नागरिकांनी तक्रार करण्यास पुढे यावे, असे आवाहनही केले. त्यानुसार माथाडी संघटनांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. मात्र त्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. या कारणावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकास तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (krishna prakash) यांनी याबाबतचे आदेश दिले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे (shivaji gaware) असे नियंत्रण कक्षाशी संलग्न केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. शहरातील एमआयडीसीच्या काही भागात माथाडी संघटनांमध्ये धुसफूस आहे. दरम्यान, काही माथाडी संघटना कंपन्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याच्या तक्रारी देखील पोलिसांकडे आल्या होत्या. या तक्रारींची वेळीच दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या.
माथाडी संघटनेच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला. या अर्जाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दुर्लक्ष केले. या कारणावरून वरिष्ठ निरीक्षक गवारे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले.
हप्ता वसुली करणे भोवले-
हप्ता वसुली करणे एका पोलीस कर्मचाऱ्याला भोवले. वाकड वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी सचिन खोपकर हा खासगी बस चालकांकडून हप्ते वसूल करीत असल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर काही प्रमाणात तथ्य आढळून आले. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस कर्मचारी खोपकर याला देखील नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.