अनियमित पाणीपुरवठा : सत्ताधा-यांच्या तोंडचे पाणी पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:16 AM2018-01-06T03:16:53+5:302018-01-06T03:17:17+5:30
पवना धरण शंभर टक्के भरले असताना पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. सत्ताधारी आणि विरोधक यास प्रशासनास जबाबदार धरत असून स्थायी समिती सभा, महापालिका सभेत याविषयावर चर्चा होऊनही हा प्रश्न सुटलेला नाही.
पिंपरी - पवना धरण शंभर टक्के भरले असताना पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. सत्ताधारी आणि विरोधक यास प्रशासनास जबाबदार धरत असून स्थायी समिती सभा, महापालिका सभेत याविषयावर चर्चा होऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. महापौर, पक्षनेते, स्थायी समिती आणि आता उपमहापौरांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी हतबल झाले आहेत. येत्या आठ दिवसांत आकुर्डी, प्राधिकरणातील पाणीपुरवठा सुरळीत करा. अन्यथा काळी ‘फित’ बांधून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, असा इशारा उपमहापौर शैलजा मोरे यांनी प्रशासनाला दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून कृत्रिम टंचाई सुरू ठेवल्याचा आरोप सत्ताधाºयांसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केला आहे. आकुर्डी, प्राधिकरण, गंगानगर आणि निगडी परिसरातील पाणीपुरवठा गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीत चर्चा झाल्यानंतर काही काळ पिण्याचे पाणी सुरळीत होते. त्यानंतर काही दिवसांनी जैसे थे परिस्थिती असते. या प्रश्नाबाबत उपमहापौर शैलजा मोरे यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांची पालिकेत बैठक घेतली. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे उपस्थित होते.
उपमहापौरांनी प्रशासनास धारेवर धरले. नाराजी व्यक्त केली. उपमहापौर मोरे म्हणाल्या, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, गंगानगर परिसरातील पाणीपुरवठा गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. प्रभागाची लोकसंख्या साठ हजारांच्या आसपास असून केवळ १९ एमएलडी पाणी येत आहे. हे पाणी पुरेसे नाही. त्यामुळे प्राधिकरणात पंचवीस एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. गेले चार दिवस पाणी वेळेवर येते तर चार दिवस पाणी येत नाही, अशी परस्थिती निर्माण झाली आहे. पाणी कमी दाबाने येत येत आहे. पाणी येण्याची वेळदेखील निश्चित नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.’’
सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर म्हणाले, ‘‘प्राधिकरण परिसरास आवश्यक असलेले पंचवीस एमएलडी पाणी दिले जाते. पाण्याची टाकी भरण्यासाठी विलंब लागत आहे. आकुर्डी, प्राधिकरणातील पाणीपुरवठा चार ते पाच दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. तो लवकरच सुरळीत केला जाईल.’’
प्राधिकरण, आकुर्डीत पुरेसे पाणी हवे
आकुर्डी, निगडी, प्राधिकरण आणि गंगानगर या परिसरात पुरेसा आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. नियमित पाणीपुरवठा व्हावा. येत्या आठ दिवसांत प्राधिकरणातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास काळी ‘फित’ बांधून प्रशासनाचा निषेध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला.
तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता, तेव्हा जास्त दाबाने आणि पुरेसे पाणी मिळत होते. आता दररोज पाणीपुरवठा होत असूनही पुरेशे पाणी मिळत नाही. पाऊस चांगला पडल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. पवना धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. हिवाळ्यात पुरेसे पाणी मिळत नाही. तर, उन्हाळ्यात काय परिस्थिती येईल, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्राधिकरणात पाणी येण्याची वेळदेखील निश्चित नाही. अवेळी पाणी येत असून, तेही केवळ दोन तास येत आहे. हा त्रास गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांना होत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशाही तक्रारी करण्यात आल्या.