घरातील कपाटात ठेवलेले दागिने सुरक्षित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 02:47 PM2022-10-31T14:47:55+5:302022-10-31T14:50:31+5:30
घरातील कपाटामध्ये ठेवलेले दागिने सुरक्षित आहेत का किंवा घराला लावलेले कुलूप सुरक्षित आहे का?...
पिंपरी : दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. यात अनेकजण कुटुंबासमवेत परगावी जाऊन दिवाळी साजरी करतात. मात्र, या कालावधीत याच संधीचा फायदा घेत चोरटेसुद्धा सक्रिय होतात. चोरट्यांकडून घरफोडी तसेच दुचाकी, चारचाकी आणि हाताला येईल ते साहित्य लांबविले जाते. त्यामुळे घरातील कपाटामध्ये ठेवलेले
दागिने सुरक्षित आहेत का किंवा घराला लावलेले कुलूप सुरक्षित आहे का? याची काळजी घेणे गरजेचे आहे.
नवरात्र, दिवाळी या कालावधीत नागरिक सहकुटुंब सण साजरा करण्यासाठी नातेवाइकांकडे तसेच परगावी पर्यटनस्थळी, धार्मिक स्थळी जातात. अशावेळी घरामध्ये दागिने, रोख रक्कम आणि विविध साहित्य सुरक्षित राहावे, यासाठी ते कपाटामध्ये ठेवले जाते. परंतु, घर बंद दिसल्यानंतर चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न होतो. यावेळी चोरट्यांकडून दागिने, रोख रक्कम, मोबाइल आणि दुचाकीसह चारचाकी वाहने पळवून नेल्याचे प्रकार घडतात.
गस्तीमुळे चोरीचे प्रकार झाले कमी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दिवाळीच्या कालावधीत पोलिसांनी गस्तीवर भर दिला. त्यासाठी स्वयंसेवक, संस्था, संघटना तसेच काही उद्योजकांची व कंपन्यांची मदत घेण्यात आली. त्यामुळे रहिवासी भागात तसेच एमआयडीसी परिसरात चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली.
सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरी
दिवाळीच्या कालावधीत यंदा शहर पोलिसांकडे २२, २४, २७ आणि २९ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी एक यानुसार चार प्रकरणांमध्ये घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. म्हेत्रे वस्ती, चिखली येथे एका दुकानातून चोरट्यांनी एक लाख १० हजारांचे कपडे व रोकड चोरून नेली. तर पिंपळे निलख येथे इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे फवारून फ्लॅटमधून सहा लाखांचा ऐवज चोरून नेला.
गावाकडून परतल्यानंतर तक्रार
पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो कुटुंबे दिवाळीनिमित्त गावी जातात. त्यातील काही कुटुंबांच्या बंद घरात चोरी केली जाते. संबंधित कुटुंब गावाकडून परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर येतो. अशा कुटुंबांकडून गावाकडून परतल्यानंतर पोलिसांकडे धाव घेण्यात येते. अशा कुटुंबांकडून या आठवड्यात घरफोडीप्रकरणी पोलिसांकडे तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
भरदिवसाही घरफोडी
शहरात भरदिवसा वाहन चोरीच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे. मुख्य बाजारपेठ तसेच शासकीय कार्यालय परिसर आणि घरासमोर लावलेल्या दुचाकीसुद्धा पळवून नेल्या जातात. तसेच बंद असलेल्या घरांच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरटे भरदिवसा घरफोडी करतात.