प्रेम खरंच आंधळं असतं का? प्रियकराला तुरुंगातून सोडवण्यासाठी मुलगी घरातून पळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 09:24 PM2023-06-07T21:24:30+5:302023-06-07T21:24:47+5:30
'माझ्या प्रियकराला तुरुंगाबाहेर काढत नाहीत. तोपर्यंत मी घरीच परतणार नाही, अशा आशयाची चिठ्ठी लिहून तरुणी फरार
पिंपरी : त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? कवी मंगेश पाडगावकरांची ही कविता खूपच प्रसिद्ध आहे. मात्र, तुमचं काय गेलं हे म्हणण्याआधी दिघी येथे एका प्रेम प्रकरणात पोलिस यंत्रणा कामाला लागली. कारण अवघ्या आठ दिवसांपूर्वी १७ वर्षीय तरुणी प्रियकरासोबत पळून गेली होती. तिच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून दिघी पोलिसांनी तरुणीचा शोध घेत तिची सुटका केली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. मात्र, 'माझ्या प्रियकराला तुरुंगाबाहेर काढत नाहीत. तोपर्यंत मी घरीच परतणार नाही, अशा आशयाची चिठ्ठी लिहून तरुणी घर सोडून पुन्हा पळून गेली. पोलिसांनी तिच्या शोधासाठी पुन्हा पथके रवाना केली आहेत.
दिघीतील मनीषा आणि राजेश (दोघांची नावे बदललेली आहेत) यांचे प्रेमसंबंध होते. मनीषा राजेशसोबत आठ दिवसांपूर्वी पळून गेली. मनीषा अल्पवयीन असल्याने पालकांनी दिघी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. तत्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी मनीषाच्या शोधासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी मनीषाची सुटका करून राजेशला ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशाने त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. मात्र, राजेशसोबत आपण स्वत:च्या मर्जीने गेल्याचे तसेच जोपर्यंत राजेशला पुन्हा त्याच्या घरी आणून सोडत नाही, तोपर्यंत घरी परत येणार नाही, अशी चिठ्ठी लिहून मनीषा घरातून पळून गेली. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी पुन्हा एकदा दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सात दिवसांपूर्वी मनीषाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. राजेशवर बाललैंगिक अत्याचार (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.
मुलांना समजून घ्या
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांची मानसिक अवस्था वेगळी असते. त्यांना सर्वांच्या समोर अपमानित करू नये. त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवावेत. करिअर आणि आपल्या आवडत्या छंदावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.
''१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून पुन्हा एकदा निघून गेल्याची तक्रार प्राप्त झाली. तिच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असून, तिचा शोध घेतला जात आहे. - मच्छिंद्र पंडित, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, दिघी पोलिस ठाणे''