पोलीस ठाण्यात धूळ खात असलेले वाहन तुमचे तर नाही ना?
By नारायण बडगुजर | Published: August 22, 2022 10:17 AM2022-08-22T10:17:11+5:302022-08-22T10:18:04+5:30
मालकाचा शोध लागूनही ३० टक्के वाहने पडून...
पिंपरी : शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांप्रमाणेच पोलीस ठाण्यांमध्ये धूळ खात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे. या वाहनांच्या मालकांचा शोध घेतला जातो. मात्र, गाडीमालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या आवारात अशा वाहनांचा खच लागत असून प्रदूषणासह अनेक समस्या उद्भवत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत १८ पोलीस ठाणे असून यातील हिंजवडी, निगडी, पिंपरी, भोसरी या पोलीस ठाण्यांमध्ये तीनशेपेक्षा जास्त वाहने धूळखात आहेत. त्या वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. भोसरी, चिंचवड आणि काही पोलीस ठाण्यांकडून यापूर्वी मोहीम राबवून गाड्यांच्या मालकांचा शोध घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा गाड्यांची भर पडली आहे.
अपघात झालेले वाहन नकोच...
अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यामध्ये आणले जाते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते वाहन घेऊन जाण्याबाबत मालक उदासीन असतात. अपघात झाल्याने ते वाहन नकोच, अशी काही मालकांची भूमिका असते. तसेच दारू, अवैध मालाची वाहतूक होणारी वाहने देखील यात असतात. वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली वाहने देखील पोलीस ठाण्यांमध्ये धूळखात असतात. चोरट्यांनी पळवून नेलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर ते पोलीस ठाण्यात पडून राहते. अशा वाहनांचीही संख्या मोठी आहे.
मालकाचा शोध लागूनही ३० टक्के वाहने पडून
बेवारस वाहनांचा शोध घेऊन त्यांच्या मालकांना वाहनाबाबत माहिती दिली जाते. मात्र, ते वाहन घेऊन जाण्याबाबत संबंधित मालक उदासीन असतात. अशा ३० टक्के वाहनमालकांकडून पोलिसांना प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.
..अशी होते लिलावाची प्रक्रिया
पोलीस ठाण्यात पडून असलेल्या वाहनाच्या क्रमांकावरून ‘आरटीओ’ कार्यालयाच्या सहकार्याने वाहन मालकाचा शोध घेतला जातो. त्यानंतर मालकाशी संपर्क साधला जातो. मालकाने प्रतिसाद न दिल्यास त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करावा लागतो. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर वाहनांचा लिलाव करता येतो.
तीन हजारांत वाहन
न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर लिलाव करण्यापूर्वी वाहनांचे मूल्यांकन करावे लागते. ‘आरटीओ’ कार्यालयातील अधिकारी मूल्यांकन करून देतात. त्यानुसार वाहनाची किंमत निश्चित करून लिलाव केला जातो. काही वाहने भंगारात जातात. अशा वाहनांच्या मूल्यांकनानुसार तीन हजारांपासून बोली लावली जाते.
केवळ शंभराच्या बाॅण्डवर मिळते गाडी
पोलीस ठाण्यात पडून असलेले वाहन त्याच्या मालकाला मिळण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प (मुद्रांक) पेपरवर बाॅण्ड करावा लागतो. मालकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वाहनाचे ‘आरसी बुक’ सादर करावे लागते. त्यानंतर भादंवी कलम १०२, १०३ अन्वये अटी व शर्तीनुसार मालकाला त्याचे वाहन दिले जाते.
पोलीस ठाण्यात पडून असलेल्या वाहनांमध्ये चोरीच्या गाड्या देखील असतात. याबाबत गाडी मालकालाही माहीत नसते. आपली गाडी आपल्या नावावर आहे का, याची खातरजमा करावी. पोलिसांनी पत्रव्यवहार केल्यानंतरही बहुतांश गाडी मालक भीतीपोटी प्रतिसाद देत नाहीत. गंगामाता वाहनशोध संस्थेची २०१५ मध्ये स्थापना केली. २०१७ पासून प्रभावीपणे काम सुरू करून पाच वर्षांत साडेसात हजारांवर बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध संस्थेच्या माध्यमातून घेतला आहे.
- राम उदावंत, अध्यक्ष, गंगामाता वाहन शोध संस्था, तळेगाव दाभाडे
अपघातग्रस्त वाहने जास्त आहेत. या वाहनांच्या मालकांशी संपर्क साधण्यात येईल. तसेच बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. संबंधित वाहनमालकांनी त्यांचे वाहन घेऊन जावे.
- शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रावेत पोलीस ठाणे